फडणवीसांच्या निवडणूक विजयाला पून्हा आव्हान

गुडधेंची आता सुप्रिम कोर्टात धाव

नागपूर / 28 जुलै : विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ होता. एकाच फोन नंबरवरून 40 ते शंभर मतदारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक मॅनेज केली? असा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल गुडधे यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे गुडधे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना चॅलेज दिल्याचे बोलले जात आहे.
गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. निवडणुकीशी संबंधित याचिका दाखल करताना प्रत्यक्ष याचिकाकर्ता उपस्थित राहाणे बंधनकारक असल्याचा युक्तिवाद फडणवीस यांच्यावतीने करण्यात आला होता. गुडधे हे याचिका दाखल करताना न्यायालयात उपस्थित नव्हते. या नियमांचा दाखल देऊन त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. विधानसभेच्या निवडणुकीच गुडधे मोठ्या फरकांच्या मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईव्हीएमने निवडणूक घेताना आयोगाने त्याची अधिसूचना का काढली नाही. यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. सोबतच उमेदवारांना व्हीव्हीपॅट उपलब्ध करून दिले जात नाही, असाही दावा त्यांनी केला होता.
राहूल गांधी यांनी महाराष्ट्राची निवडणूक भाजपने मॅनेज केली असा आरोप केला होता. त्यात त्यांनी फडणवीस यांच्या मतदारसंघाचाही उल्लेख केला आहे. या मतदारसंघात लोकसभा ते विधानसभा या पाच महिन्यांच्या कार्यकाळात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश मतदार बोगस असल्याचा आरोप त्यांचा होता. त्यानंतर गुडधे यांनी पत्रकार परिषद घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदीचा तपशील निवडणूक आयोगामार्फत दिला जात नसल्याचे सांगितले. माहिती अधिकार कायद्यांतर्गतही माहिती दिली जात नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन मतदार नोंदणीचा स्वतंत्र डेटा उपलब्ध नसल्याचे आपणास कळवण्यात आल्याचे गुडधे यांनी सांगितले होते.
यावेळी त्यांनी एकाच मोबाईल नंबरवरून 40 ते 100 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. याची एकाही अधिकार्‍याने पडताळणी केली नाही. वास्तविक मतदार नोंदणीत शंका आल्यास प्रत्यक्ष स्थळी जाऊन सबंधित अधिकार्‍याने खातरजमा करण्याचा नियम आहे. तोही मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पाळला गेला नाही. निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणांनी सत्ताधार्‍यांना मदत केली. याच वाढीव मतदारांच्या मतदानातून फडणवीस निवडून आले. त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी गुडधे यांनी यापूर्वीच केली आहे. गुडधे काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव असून मतदार याद्या तपासण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आलेल्या समितीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button