दिव्यांग विक्रेत्यांच्या मंजूर खोक्यांची तोडफोड

शिवसेना उबाठा पक्ष आक्रमक

-नुकसानग्रस्तांना भरपाई व नव्या जागांची मागणी
अमरावती / 28 जुलै : रोजगाराच्या आशेवर उभारलेले अपंग विक्रेत्यांचे मंजूर खोके अमरावती महानगरपालिकेने अतिक्रमणाच्या नावाखाली पाडून टाकल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या योजनेंतर्गत मिळालेल्या अनुदानाचा उपयोग अपंगांनी व्यवसायासाठी केला होता. मात्र, यंत्रणांच्या अनास्थेमुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर गदा आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आवाज उठवत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकायुक्त कार्यालय पुणे, तसेच खासदार बलवंत वानखडे, आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्याकडे निवेदन सादर केले. संबंधित दिव्यांग विक्रेत्यांना नूकसानभरपाई मिळावी आणि त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. अपंग विक्रेत्यांना शासनाच्या योजनेंतर्गत वीस हजार रुपयांचा निधी देऊन रोजगारासाठी मंजूरी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपली खोके उभारली. परंतु, पालिकेने अचानक हे खोके हटवण्याची मोहीम राबवली आणि अपंग नागरिक पुन्हा बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले.
प्रविण हरमकर यांनी निवेदनातून विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये नुकसानग्रस्त अपंग विक्रेत्यांना तात्काळ आर्थिक भरपाई द्यावी, नवीन जागा व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, संबंधित अधिकार्‍यांवर चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, 9 मार्च 2023 रोजी आंदोलना दरम्यान दिलेले जागा देण्याचे आश्वासन पाळावे, काही ठिकाणी महानगरपालिकेनेच दिलेल्या जागांवर अन्य व्यक्तींचे अतिक्रमण असूनही, त्यांच्या विरोधात कारवाई नाही; परंतु दुसरीकडे मंजूर खोके उभारलेल्यांना लक्ष्य केले जात आहे. हा दुजाभाव थांबवावा, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश आहे.
या निवेदनासोबत मंजुरीपत्रे, अनुदानाची पावती, व अन्य आवश्यक पुरावे सादर करण्यात आले आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी गोविंद दायमा, हेमंत लिखार, अतुल चिडम, नंदु वानखडे, कमलेश गुप्ता, सुरेश वैष्णव, संदिप अवस्थी, निलेश शर्मा, प्रमोद वानखडे, लाला अंजूम, राजु मोहोड, सुनील मोहदे, सदाशिव खटोले, सैय्यद अब्बास आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button