लोकशाहीविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा : काँग्रेसची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

-नागरिकांची गळचेपी होत असल्याचा आरोप
-सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
-असंख्य नेते-कार्यकर्त्यांचा सहभाग
अमरावती / 17 जुलै : महाराष्ट्र शासनाने पारित केलेला जनसुरक्षा कायदा लोकशाही प्रणालीच्या विरूध्द आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे स्वातंत्र्य व हक्कांवर गदा येउन त्यांची गळचेपी होणार आहे. असा आरोप करित काँगे्रस पक्षाच्या वतीने या कायद्याला तीव्र विरोध दर्शविण्यात आला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी जोरदार निदर्शने करुन जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले गेले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशावरुन आज राज्यभर काँग्रेस पक्षाने जनसुरक्षा कायद्याविरोधा निदर्शने केली. त्याचाच भाग म्हणून अमरावतीतही असंख्य काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जनसुरक्षा कायदा म्हणजे सरकारने लोकशाही राज्यात चालविलेली एकप्रकारची दडपशाही असल्याचा आरोप करुन सरकारने या कायद्याचा पुनर्विचार करावा आणि हा कायदा तात्काळ रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकार्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना हे निवेदन पाठविण्यात आले.
हा कायदा व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणू शकतो. तसेच याची व्याख्या व्यापक आणि अस्पष्ट असल्याने याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देशांतर्गत सुरक्षेच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचे हे एकप्रकारचे षडयंत्र आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे. यावेळी ‘जनसुरक्षा कायदा रद्द करा, लोकशाही वाचवा’, ‘स्वातंत्र्यावर गदा नको’, ‘भारतीय जनता पक्षाचा निषेध असो’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. त्याद्वारेे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा कायद्याविरोधात आपला रोष व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, वंदना कंगाले, अशोक थोरात आणि मिलिंद चिमोटे, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांनी केले. या आंदोनलनात मनपा स्थायी समितीचे माजी सभापती बाळासाहेब भुयार, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नीलेश गुहे, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, मुन्ना राठोड, संजय वाघ, विनोद मोदी, कीर्तीमाला चौधरी, वंदना थोरात, अनिला काझी, शिल्पा राऊत, अस्मा परवीन, कलाम ठेकेदार, भारती क्षीरसागर, नेहा बागडे, सलीम बेग, प्रदीप हिवसे, विजय वानखडे, सुनील जावरे, गजानन जाधव, फिरोज शाह, समीर जवंजाळ, डॉ. मतीन अहेमद, राजीव भेले, गजानन राजगुरे, डॉ. संजय शिरभाते, गजानन रडके, डॉ. आबीद हुसैन, शेख अफजल चौधरी, अनिल माधोगढीया, सतीश मेटांगे, रमेश राजोटे, अभिनंदन पेंढारी, किरण साऊरकर, विकास धोटे, अरुण बनारसे, अरुण जयस्वाल, विजय चौधरी, मोहम्मद साबीर, शाहीन शाह, विजय खंडारे, विजय बर्वे, मोहम्मद निजाम, भैय्यासाहेब निचळ, अमर देशकर, सतीश काळे, नितीन काळे, संकेत साहू, सौरभ तायडे, शुभम बांबल, स्वप्नील साव, सोमेश्वर गौड, उमेश घोडकी, रोहन चिमोटे, तुषार राऊत, संजय मोरे, मोहम्मद शरीफ शेख हबीब, शेख मुश्ताक, किशोर पाटील, अतुल काळबेंडे, संजय बोबडे, प्रकाश पहूरकर, विक्की वानखडे, राजेश उपलकर, नाना बारबुद्धे, अक्रम अली, इस्रार आलम, अजय कुबडे, प्रशांत मोखडे, चेतन कांडलकर, सूरज खैरे, प्रथमेश गावंडे, अशोक राऊत, जे. जे. मडावी, छत्रपती राऊत, सुभाष चव्हाण, हिरामण गावंडे, जगदीश तायडे, रवी ढोले आदी उपस्थित होते.
-तर महाराष्ट्र रस्त्यावर येईल
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज आम्ही या काळ्या कायद्याविरोधात केवळ निवेदन दिलेल आहे. उद्या या दडपशाहीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला. तर माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख म्हणाले की, हा काळा कायदा लोकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या विरोधात आहे. तुमच्या विचारधारेच्या विरोधात जे आहे त्यांच बोलणं दडपशाहीने बंद करण्यासाठी, त्यांच्या विचारांवर बंधन आणण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे. खा. बळवंत सरकारवर टीका करताना म्हणाले की, भारतीय दंड विधानात याबाबत आधीच तरतूदी असताना या नव्या कायद्याची गरजच काय? सर्वसामान्यांचा हक्क हिरावून घेणार्या या कायद्याचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी वानखडे यांनी केली.




