चिखलदर्यात पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज
आता शुक्रवार ते सोमवार ‘वन-वे’ वाहतूक

-‘पार्किंग’मध्ये सुधारणा, पोलिसांची अतिरिक्त तैनाती
-जिल्हाधिकार्यांचे आदेश, बैठकीत ठरल्या उपाययोजना
-रविवारी कोलमडली होती व्यवस्था
अमरावती / 16 जुलै: सध्या पावसाळ्यात जिल्ह्यातील चिखलदरा या पर्यटनस्थळाचे नैसर्गिक सौंदर्य खुलले असून त्याचा आनंद घेण्यासाठी विदर्भासह महाराष्ट्रातून पर्यटक सध्या हजारोंच्या संख्येने येथे भेट देत आहेत. प्रामुख्याने शनिवार आणि रविवारी पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक गाठला जात आहे. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होवून पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमिवर चिखलदराकडे जाताना आणि चिखलदरावरून परतवाड्याकडे येताना वनवे वाहतूक नियमन आता शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी दिले आहे.
मागच्या रविवारी चिखलदर्यात पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला होता. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडी होउन वाहनांच्या दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना आणि पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. या समस्येवर तोडगा काढण्याच्यादृष्टीने विचारविनीमय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बुधवारी एक बैठक पार पडली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह चिखलदरा आणि धारणीचे तहसीलदार, उपवनसंरक्षक आणि नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये प्रामुख्याने पर्यटकांना येणार्या अडचणींबाबत चर्चा करण्यात येउन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापूर्वी शनिवार व रविवार या दोन दिवसांत चिखलदराला जाणारी वाहतूक आणि चिखलदर्यावरून परतवाड्याकडे येणारी वाहतूक ही वनवे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आत बदल करून ही वनवे वाहतूक आदल्या दिवशीपासूनच म्हणजे शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते पुढील दिवस म्हणजे सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत लागू राहील. यामुळे वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
पर्यटकांच्या सुविधांसाठी पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना पार्किंगसाठी अतिरिक्त जागा शोधण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. आवश्यकतेप्रमाणे पार्किंगसाठी खाजगी जागा अधिग्रहित करण्यात येणार आहे. सर्व विभागांशी समन्वय उत्साही पर्यटकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. पर्यटकांनी चिखलदर्याला भेट द्यावी व निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
-‘चोक पॉइंट’वर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त
जेथे वाहतूकीची कोंडी होते असे सहा चोक पॉईंट्स शोधण्यात आले आहेत. याठिकाणांसह चिखलदर्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. 50 पोलिसांची अतिरिक्त तैनाती राहणार आहे. त्यांच्यामार्फत वाहतूक नियंत्रण करण्यात येईल. सोबतच वनविभागाच्या नाक्यावर वाहनांच्या लांब रांगा कमी करण्यासाठी अतिरिक्त वनकर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नगर परिषदेच्या नाक्यावरही कर्मचार्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
-पर्यटकांना लुटणार्या व्यावसायिकांवर कारवाई!
चिखलदरा येथे होत असलेल्या गर्दीचा काही दुकानदार आणि व्यावसायिकांकडून गैरफायदा घेतला जात आहे. पाण्याची बाटली व इतर खाद्यपदार्थांची नियत दरापेक्षा जास्त दराने विक्री करुन पर्यटकांची लुट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सर्व आस्थापनांना बैठकीत सूचना देण्यात आल्या. जादा दराने विक्री करणार्या व्यावसायिक, दुकानदारांवर ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. असा गैरप्रकार झाल्यास पर्यटकांनी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




