जलयुक्त शिवार योजनांची कामे तातडीने करा

एल निनोच्या धोक्यावर मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई/20 एप्रिल- संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात.
पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी बोलत होते. जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच जुन्या जल स्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. यामुळे कमी पैशात जास्त पाणी साठा उपलब्ध होईल. कमी पावसाच्या परिस्थितीतही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी हीच साधने प्रभावी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. जी राम जी योजनेतून होणारी जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जी रामजी मधून जास्तीत जास्त कामे मिळविण्यासाठी टास्क फोर्स तयार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता असून पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button