बिच्छन नदीत बूडून दोन चिमुकल्यांचा मृत्यु

अचलपूरच्या बुरडघाटची घटना

-मृतक आत्येभाउ-मामेभाउ
अमरावती / 11 जुलै: मित्रांसमवेत गावानजीकच्या नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा खाल पाण्यात बूडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना अचलपूर तालुक्यातील बुरडघाट येथे घडली. भावेश रवी चौरासे (वय 11) आणि दीपक तुलसीदास ब्राह्मणे (वय 10) अशी मृतक बालकांची नावे आहेत. हे दोघे नात्याने आत्येभाउ-मामेभाउ होते. या घटनेमुळे चौरासे व ब्राह्मणे कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावावरही शोककळा पसरली आहे.
बुरडघाट या गावाजवळून बिच्छन नदी वाहते. सध्या सततच्या पावसामुळे नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. अशातच आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास बुरडघाट येथील मित्र असलेली पाच लहान मुले या नदीवर आंघोळीसाठी गेली होती. सर्वजण नदीपात्रात बुडाले. मात्र भावेश आणि दीपक यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पोहत-पोहत ते खोल पाण्यात शिरले आणि क्षणार्धात बुडाले. हा प्रकार पाहुण सोबतची अन्य तीन मुले घाबरली. त्यांनी लगेच गावात धावत जावून लोकांना याबाबत माहिती दिली. काही ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
दोन्ही चिमुकल्यांना नदीतून बाहेर काढण्यात आले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे चौरासे व ब्राह्मणे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. गावातही शोककळा पसरली असून चिमुकल्याच्या अशा अपघाती मृत्युबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकांपैकी भावेश चौरासे हा गौरखेडा कुंभी येथे एका खाजगी कॉन्वेंटमध्ये इयत्ता पाचवी तर दीपक ब्राह्मणे हा इयत्ता चौथीत शिकत होता.

संबंधित बातम्या

Back to top button