भींत अंगावर कोसळून 3 वर्षीय चिमुरडा दगावला

वृद्धा जखमी, मोर्शीच्या हिवरखेडमधील घटना

-आजीसमवेत मंदिराज जाताना अघटित घडले
मोर्शी / 9 जुलै: आजीसोबत देवदर्शनासाठी गावातील मंदिरात जात असताना पावसामुळे शिकस्त झालेली भींती अचानक अंगावर कोसळून एका 3 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना मोर्शी येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरखेड येथे मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटने मृत बालकाची आजीही गंभीररीत्या जखमी झाली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
स्वरूप प्रशांत गांजरे असे मृतक बालकाचे नाव आहे. तर त्याची आजी रेखा सुखदेवराव गांजरे या जखमी झाल्यात. गांजरे कुटुंब हिवरखेडच्या माळीपूरा परिसरात राहते. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास चिमुकला स्वरूप आपली आजी रेखा गांजरे यांच्यासोबत गावातील अवधूत मंदिरात दर्शनासाठी जात होता. दरम्यान याच रस्त्यावर राहणारे सुरेंद्र खेरडे यांच्या घराची भींत पावसामुळे शिकस्त झाली होती. स्वरुप आणि रेखा गांजरे हे आजी व नातू खेरडे यांच्या घरासमोर पोहोचले त्याचवेळी ही भींत त्यांच्या अंगावर कोसळली.
दोघेही विटा, माती खाली दबले गेले. अचानक झालेल्या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली. घटनेत स्वरुपचा घटनास्थळीच मृत्यु झाला. तर रेखा गांजरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ मोर्शी येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्यांना अमरावती येथे एक्झॉन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विनोद वानखडे व महसूल अधिकारी हिवरखेड यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. आज बुधवारी, रोजी मृतक स्वरूप याच्या मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार पार पडले. या दुर्दैवी घटनेत एका निष्पाप चिमुकल्याचा बळी गेल्याने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दिवसापासून मोर्शी शहरासह तालुक्यात संततधर पाऊस कोसळत असल्यामुळे शिकस्त भिंतीमध्ये पाणी मुरूम हा अपघात झाल्याचे सांगण्यात यंत आहे. प्रशासनाने असे आणखी अपघात घडून जिवितहानी होउ नये याकरिता, शिकस्त घरांचा व भिंतीचा ग्रामपंचायत स्तरावर सर्वे करावा. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आर्थिक मदत देऊन दुरवस्था झालेल्या घरे व भिंतींच्या दुरुस्तीसाठी मदत उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल भोजने यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button