आषाढी एकादशी : विठुरायाच्या भक्तीत अमरावती तल्लीन

‘विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास...’

-भाविकांची मांदीयाळी, मंदीरे गर्दीने फुलली
-दर्शनासाठी रांगा, ठिकठिकाणी फराळाचे वाटप
अमरावती / 6 जुलै: अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडूरंग अर्थात श्री विठ्ठलाच्या भक्तीत आज संपूर्ण अमरावती शहर व जिल्हा तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. ठिकठिकाणी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरांसोबतच इतर मंदिरांमध्येही आज आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल मंदिरांमध्ये लेकुरवाळ्या भगवंताच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येथे भक्तांचा मेळा भरला होता. सकाळपासून रांगा लावून विठ्ठल भक्तांनी दर्शन घेतले. जणू पंढरी अवतरल्याचा भास होत होता.
आषाढी एकादशीचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीला विठुरायासह भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी या नावानेदेखील ओळखले जाते. भागवत सांप्रदायांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. जिल्ह्यातील रुख्मिणी मातेचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे आषाढी एकादशीचा मोठा उत्सव सुरु आहे. येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी अमरावतीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून हजारो भक्त दाखल झाले होते. वर्धा नदीच्या तिरावर स्नानविधी आटोपून भक्त मंदिरात दर्शनाचा लाभ घेताना दिसले. गावोगावहून अनेक पालख्या कौंडण्यपूरात आल्या असून विठूनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गुरुकुंज मोझरीच्या दासटेकडीवर रामकृष्णहरी मंदिरातही आषाढी एकादशीचा उत्साह होता. येथेही असंख्य भाविक पालख्यांसह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. अमरावती शहरात जून्या भागातील पुरातन विठ्ठल मंदिरासोबतच सदिच्छा कॉलनी, विनायक नगर, आसरा माता विठ्ठल मंदिर यशोदा नगर, खापर्डे बगिचा, बडनेरा येथे नवीवस्तीतील शिक्षक कॉलनी आणि जुनीवस्तीतील माळीपूरा भागात असलेले विठ्ठल मंदिर, हरिओम कॉलनी, राजापेठ येथील विठ्ठल मंदिरांसह ज्या ज्या मंदिरांमध्ये विठ्ठल-रुख्मिणीच्या मुर्ती आहेत तेथे भक्तांनी दर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.
हरीनामाच्या जयघोषात विठ्ठल भक्तीचा सोहळा रंगला असताना अनेकांनी विश्वमांगल्याची प्रार्थना केली. ठिकठिकाणी किर्तन, भजनाचे कार्यक्रम पार पडले. ध्वनीक्षेपकावरील संतांच्या सांगितिक अभंगरचनांनी सर्वत्र अध्यात्मिक संचार झाल्याचा अनूभव येत होता. मंदिरांमध्ये पालखी सोहळेही आयोजित करण्यात आले होते. आज बहुतांश लोकांनी आषाढी एकादशीचे व्रत पाळून उपवास केला. अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकरिता फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपवासाच्या पदार्थांचे वितरण करण्यात आले.
-कौंडण्यपूरात महाभिषेक-महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी संस्थानमध्ये महापूजेचे आयोजन करण्यात आले. महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भजन-कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. वर्‍हा, कुर्‍हा, मार्डा, अंजनवती, मसदी, चेनुष्ठा, बोर्डा, हसनापूर, भिवापूर, वीरगव्हाण, मार्डी, शेंदुरजना खुर्द, अहिरवाडा, टाकरखेड, नांदपूर, देऊरवाडा, वाठोडा खुर्द आदी गावांतील भजन-कीर्तन मंडळांनी आपापले सादरीकरण केले. भाविक भक्तांना फराळाचा महाप्रसाद वितरित करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button