उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे ‘रुदाली’ दर्शन
देवेंद्र फडणवीस यांची टीका

-राज ठाकरे यांचे मानले आभार
पंढरपूर / 5 जुलै: ’मराठी भाषे’च्या मुद्यावरून ठाकरे बंधू आज (5 जुलै) एकाच राजकीय मंचावर आले होते. वरळी डोम इथं मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांच्याकडून ’विजयी मेळाव्या’चं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या टीकेला प्रत्युत्तर देत हा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘रुदाली’ कार्यक्रम असा केला आहे. ते पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते.
वरळीत आज मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांचा संयुक्त ‘विजयी मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण सर्वप्रथम झालं. त्यांनी भाषणाची सुरुवाताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारत केली. जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. फडणवीसांनी आम्हा दोघांना एकाच मंचावर आणलं, अशी सुरुवात राज यांनी केली. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. खोचक सुरात फडणवीस म्हणाले, मी राज ठाकरे यांचे आभार मानतो, की त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं. श्रध्देय बाळासाहेबांचे आशीर्वादही मलाच मिळतील. पुढे बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देखील दिलं.
विजयी मेळाव्यातील आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बर्याच दिवसांनी राज आणि माझी भेट राजकीय मंचावर झाली. त्यांनी मला सन्मानीय उद्धव ठाकरे असं म्हटलं आहे. आता माझ्या भाषणाची सुरुवातही करताना मी सन्मानीय राज ठाकरे अशीच करेन. इथल्या कार्यक्रमाची मांडणी राजने केली आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाली तेव्हापासून सगळ्यांचं लक्ष आम्ही काय बोलणार? याकडे पण आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्यात जो काही आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला होता.




