अप्पर वर्धा धरणाला पाण्याची प्रतीक्षा!
जलाशयातील पातळी घटली!

-पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाउस
मोर्शी / 4 जुलै: अमरावती जिल्ह्यातील मोठ्या भागासाठी वरदान असलेल्या आणि मोर्शी शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावरील अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयाची पातळी गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात खालावली आहे. पावसाळा सुरु होवून प्रदिर्घ कालावधी उलटून गेल्यानंतरही या प्रकल्पाला अद्याप पाण्याची प्रतिक्षा आहे. अप्पर वर्धाचे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण असले तरी या संपूर्ण भागात यंदा झालेला पाउस अत्यल्प असल्याने जलाशयात अंदाजित पाण्याची साठवणूक झालेली नाही.
अप्पर वर्धा जलाशयाची पाणी पातळी आज 4 जुलै रोजी 338.13 मीटर एवढी आहे. 30 एप्रिल रोजी आणि नंतर मे महिन्यात जलाशयात 338.60 मीटर एवढा पाणीसाठा होता. त्यावेळी धरण 47.64 टक्के भरले होते. दरम्यान आज 4 जुलै रोजी धरणात केवळ 42.68 एवढेच पाणी आहे. अप्पर वर्धा धरणाची निर्धारित जलाशयाची पातळी 342.50 एवढी ठेवण्यात आली आहे. यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन दिवसाच्या पावसामुळे मध्यप्रदेशातून वाहत येणार्या माडू नदीला थोडेफार पाणी येऊन अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयाची पातळी दोन सेंटीमीटरने वाढली होती. मात्र आता मोर्शी शहरासह तालुक्यात पाउस कमी प्रमाणात कोसळत असल्यामुळे पुन्हा जुलै महिन्यात जलाशयाची पातळी घटली आहे.
अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयातून नगरपरिषद मोर्शी, नगरपरिषद वरुड, महानगरपालिका अमरावती, नांदगाव पेठ एमआयडीसीतील रतन इंडिया वीद्युत प्रकल्प, एमआयडीसीतील अन्य काही कारखाने यासह हिवरखेड, लोणी, राजुरा आदी गावांना पाणीपुरवठा होतो. दरवर्षी 15 जुलैनंतर पाऊस मूबलक प्रमाणात कोसळतो, असा परिपाठ आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असते. गेल्यावर्षी 5 ऑगस्टला अप्पर वर्धा धरणाच्या तेरा दरवाजांपैकी दोन दरवाजे उघडण्यात येउन पाण्याचा विसर्गही सुरु करण्यात आला होता. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी 13 पैकी 11 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात येऊन 693 क्युसेक घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता.
14 ऑगस्ट रोजी अप्पर वर्धा धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे या रंगीबेरंगी आकर्षक रोषणाईने करण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांना भुरळ पडून हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनले होते. यावर्षीचा जून महिना संपला असून 5 जुलै पर्यंत मोर्शी शहरासह तालुक्यात अगदी कमी प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे जलाशयाच्या पातळीत वाढ झाली नाही. उलट पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाला अद्यापही पाण्याची प्रतीक्षा आहे.




