खाकीच्या नाकाखालीच अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट
बडनेरा शहरात भंगार गल्लीत वरली मटका जोमात

कष्टकरी कामगारांचे संसार उघड्यावर पडण्याची भीती
बडनेरा/25 नोव्हेंबर– स्थानिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला अवैध वरली मटका व्यवसाय सोमवारपासून पुन्हा खुलेआम सुरू झाला आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या आठवडी बाजार परिसरातील भंगार गल्लीत मटका चालकांनी आपले बस्तान मांडले असून, एका पांढरपेशा पुढार्याच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. विशेष म्हणजे, बडनेरा पोलीस ठाणे आणि गुन्हे शोध पथकाच्या नाकाखालीच हा प्रकार सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बडनेरा शहर आणि परिसरात मागील काही काळापासून मटका व्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे मोलमजुरी करणार्या कष्टकरी कामगारांच्या घरातील चुली व्यवस्थित पेटत होत्या आणि कुटुंबांत शांतता होती. मात्र, सध्या महागाई आणि दुष्काळाच्या झळांमुळे सामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे. अशा कठीण काळात सोमवारपासून शहरातील सर्व मटका चालक एकत्र आले आणि त्यांनी भंगार गल्लीत आपले अड्डे पुन्हा थाटले आहेत.
बडनेरा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य चौकातील मौलाना अबुल कलाम आझाद बाजार परिसरासमोर आणि मनोज हार्डवेअररंग दुकानाच्या गल्लीतील भंगार दुकानाशेजारी हा खेळ खुलेआम सुरू आहे. या ठिकाणी मटका चालक आणि त्यांचे आकडे लिहिणारे साथीदार बिनधास्त बसलेले दिसतात. रोजंदारीवर काम करणारे मजूर आपली कष्टाची कमाई या जुगारात लावत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. एका पांढरपेशा नेत्याच्या वरदहस्तामुळेच पोलीस ठाण्याचा कारभार चालतो आणि त्याच नेत्याच्या आशीर्वादाने हा अवैध धंदा सुरू असल्याची जोरदार कुजबुज नागरिकांमध्ये आहे. पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि ठाण्याचा कणा मानले जाणारे गुन्हे शोध पथक या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल सामान्य जनता विचारत आहे. आता बडनेरा पोलीस या अवैध धंद्यावर नेमकी कधी कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





