कोदोरीत ई-क्लास जमिनीची जेसीबीने चाळण, वाळू तस्करीचा सुसाट धंदा

70 ते 80 ट्रॅक्टरमधून दररोज वाळूची वाहतूक

तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

चांदूरबाजार/25 नोव्हेंबर : तालुक्यातील मौजा कोदोरी येथे ई-क्लास जमिनीची अक्षरशः चाळण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून जमिनीतून वाळू काढली जात असल्याचा चित्र असून, या ठिकाणाहून काढलेली वाळू तालुक्यातील विविध गावांमध्ये खुलेआम विक्रीसाठी पाठविली जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जात असताना स्थानिक महसूल प्रशासनाने नेमकी कोणती कारवाई केली, हा संतप्त करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोदोरी येथील पोलीस पाटील यांनी हा प्रकार उजेडात आणल्याने कथित वाळू तस्करीच्या प्रकरणाला आता वाचा फुटली आहे. ई-क्लास जमिनीवर जेसीबीच्या साह्याने खोदकाम होत असताना संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी आणि स्थानिक महसूल यंत्रणा नेमकी काय करीत होती? त्यांच्या नजरेसमोर हा प्रकार सुरू होता की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते? संबंधित अधिकार्‍यांच्या भूमिकेची सखोल चौकशी होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, दररोज तालुक्यातून इतर भागतून अंदाजे 70 ते 80 ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक होत आहे. कोदोरी परिसरातून सुरू असलेल्या या कथित तस्करीचे जाळे चांदूरबाजार तालुक्यातील विविध गावांपर्यंत पसरल्याचे बोलले जात आहे. चांदूरबाजार, ब्राह्मणवाडा थडी, आसेगाव, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत परिसरांत वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यातील कथित वाळू तस्करीचा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचा आरोप आहे. महसूल आणि पोलीस विभागाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी निश्चित ठिकाणी माहिती देणारे लोक तैनात असल्याची चर्चा आहे. कारवाईसाठी पथक रवाना झाल्याची माहिती संबंधित वाहनचालकांपर्यंत आधीच पोहोचत असल्याने पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहने गायब होतात, असे असेल तर कारवाईची गोपनीय माहिती बाहेर कशी पोहोचते? प्रशासनातील कोणत्या घटकांकडून तस्करांना मदत मिळते का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता आवश्यक झाले आहे. कारवाईपूर्वीच माहिती फुटत असेल तर त्याची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे.
महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय?-तहसीलदारांकडून वेळोवेळी अवैध वाळू उपशाविरोधात कारवाईच्या सूचना दिल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर अपेक्षित कारवाई होत नसल्याचे चित्र स्थानिक ग्रामीण पातळीवर होत असलेल्या वाळू तस्करी वरून दिसून येते. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम व वाळूची वाहतूक होत असेल, तर त्याची नोंद प्रशासनाकडे का नाही? संबंधित अधिकार्‍यांनी वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही? त्यांच्या कर्तव्यपालनाची तपासणी होणार की नाही? काही महसूल कर्मचारी आणि पोलीस विभागातील व्यक्तींचे वाळू तस्करांशी साटेलोटे असल्याचे देखील सूत्रांची माहिती आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे केवळ नेहमीच्या अवैध उत्खननाच्या तक्रारीप्रमाणे न पाहता संभाव्य संगनमताच्या दृष्टीनेही तपास करणे गरजेचे आहे.
प्रशासनातील ’विभीषण’ शोधणार कोण?-चांदूरबाजार तहसील कार्यालयापासून अवघे दहा किलोमीटर अंतरावर कोदोरी बरोबर चांदूरबाजार तालुक्यातील इतर भागातून होत असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा प्रश्न आता केवळ महसुली नुकसानीपुरता मर्यादित राहिलेला नाही. शासनाच्या जमिनीची हानी, पर्यावरणाचे नुकसान आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर निर्माण झालेले प्रश्न यामुळे हा विषय गंभीर बनला आहे. तस्करीला संरक्षण देणारे कोणी असेल, तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे.
आता प्रश्न एकच – कोदोरीतील वाळू तस्करीवर महसूल आणि पोलीस प्रशासन खरोखरच कारवाई करणार की पुन्हा एकदा कागदोपत्री आदेश काढून प्रकरण थंडबस्त्यात टाकणार?
ई-क्लास जमिनीवरील उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, जेसीबी आणि वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी करावी, संबंधित तलाठी व मंडळ अधिकार्‍यांच्या कार्यकाळातील नोंदी तपासाव्यात आणि कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. कोदोरीतील वाळू उपशाच्या प्रकरणात वरिष्ठ महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Back to top button