निर्मल उज्वल बँकेचा हर्रास करू, ठेवीदारांचे पैसे देऊच
हजारो खातेदारांच्या पैशांसाठी आ. बच्चू कडूंचा आक्रमक इशारा

हिवाळी अधिवेशनात जनतेचा आवाज बुलंद करणार
अमरावती/25 नोव्हेंबर- निर्मल उज्वल बँकेत अडकलेले ठेवीदारांचे हक्काचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रसंगी बँकेच्या संचालक मंडळाची मालमत्ता जप्त करून तिचा हर्रास करू पण खातेदारांचा पै न पै परत देऊ असा आक्रमक इशारा माजी मंत्री आ. बच्चू कडू यांनी बुधवार 25 नोव्हेंबर रोजी धामणगाव रेल्वे मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत संवाद साधताना दिला असून येत्या 7 डिसेंबरपासून सुरू होणार्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न धसास लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. धामणगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव, धामणगाव आणि चांदूर रेल्वे परिसरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत संवाद साधताना आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण राज्यातील सुमारे 1 लाख 20 हजार सामान्य खातेदारांचे 1300 ते 1400 कोटी रुपये निर्मल उज्वल बँकेत अडकून पडले आहेत. मानमळे हे या बँकेचे संचालक असून अनेकगरजू ग्राहक आपल्या कष्टाच्या पैशांसाठी प्रत्येक शाखेत चकरा मारत आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यांना पैसे मिळालेले नाहीत. ठेवीदारांची ही फरपट आता सहन केली जाणार नाही. येत्या हिवाळी अधिवेशनात हा ज्वलंत प्रश्न लावून धरू व वेळ पडल्यास संचालक आणि अध्यक्षांच्या मालमत्तेचा लिलाव करून लोकांचे पैसे परत मिळवून देऊ असा कडक इशारा त्यांनी दिला.यासोबतच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण न करता गावखेड्यापर्यंत सेवेचा मजबूत पाया उभारून घरोघरी पक्षाचे काम पोहोचवले जाईल. 2029 च्या विधानसभा निवडणुकीबाबत आताच बोलणे योग्य ठरणार नसून त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे ते म्हणाले. दिवाळीत शेतकर्यांना मिळालेली 5 हजार रुपयांची मदत अपुरी असली तरी ती थट्टा म्हणता येणार नाही, मात्र हा निधी वाढवून मिळावा यासाठी नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच कोळसा खाण प्रकल्पग्रस्त, सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांचे जाच, भूमिहीन आणि कष्टकरी मजुरांचे प्रश्नही अधिवेशनात मांडले जातील व नागपूर येथील आगामी आंदोलनाची दिशा 29 तारखेला ठरवली जाईल असेही त्यांनी सांगितले
बँक गुंतवणुकीबाबत नागरिकांना कडूंचे मोलाचे आवाहन
अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील महालक्ष्मी पतसंस्थेसह विविध खाजगी बँकांच्या फसवणुकीच्या 20 ते 25 तक्रारी समोर आल्या आहेत. नागरिकांनी जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडून किंवा मध्यस्थांवर विश्वास ठेवून तात्पुरत्या उभ्या राहिलेल्या खाजगी संस्थांमध्ये कष्टाचा पैसा गुंतवू नये. सुरक्षित भविष्यासाठी केवळ राष्ट्रीयकृत बँकांवरच विश्वास ठेवून नागरिकांनी जागरूक राहावे असे आवाहन आ. बच्चू कडू यांनी केले.





