मानवी तस्करी प्रकरणातील दलालांवर पोलिसांची करडी नजर
डॉ.वैशाली प्रफुल्ल भोजने नवजात बालक प्रकरणी मोठे खुलासे

तपासणी अहवालाची प्रतीक्षा; 12 आरोपी जेरबंद
आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठी जोरदार हालचाली
अमरावती /25 नोव्हेंबर- शहरातील गाजलेल्या डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने नवजात बालक विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळणार आहे. फ्रेजरपुरा पोलिसांना या प्रकरणातील वैद्यकीय आणि अनुवांशिक नमुना तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल हाती येताच बालकांची विक्री करणार्या दलालांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तसेच या संपूर्ण जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने, निर्मल सरदार यांना पुन्हा पोलीस कोठडीत घेण्या साठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरातील नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीच्या प्रकाराने सर्वत्र मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणात फ्रेजरपुरापोलिसांनी आतापर्यंत 12 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहेत. पोलिसांनी कारवाईदरम्यान 4 नवजात बालकांना ताब्यात घेतले होते. या बालकांचे आणि त्यांना विकत घेणार्या जोडप्यांचे रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या अहवालावरून या बालकांचे खरे जन्मदाते कोण आणि हा व्यवहार कसा झाला, याचा उलगडा होणार असल्याने तपास पथकाचे याकडे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पोलिसांनी प्रामुख्याने बालके विकत घेणार्यांवर कारवाई केली होती. मात्र या काळ्या धंद्यामागे अनेक पडद्यामागचे चेहरे असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. बालकांच्या विक्रीसाठी संपर्क साधणे, पैशांचा व्यवहार ठरवणे आणि बालके योग्य ठिकाणी पोहोचवणे यासाठी दलालांनी मोठी भूमिका बजावली आहे. वैद्यकीय नमुन्यांचा अहवाल मिळताच या दलालांची नावे समोर येतील आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील.या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने, निर्मल सरदार यांच्या सहभागाबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. हा प्रकार केवळ 4 बालकांपुरता मर्यादित नसून यामागे मोठे जाळे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या तिघांना पुन्हा पोलीस कोठडीत घेऊन कसून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चौकशीतून आणखी किती बालकांचे व्यवहार झाले आणि यात कोणकोणते मोठे मासे अडकले आहेत, हे स्पष्ट होणार आहे. ज्या जोडप्यांना बालके विकली गेल्याचा संशय आहे, त्यांचाही शोध पथकांकडून घेतला जात आहे.





