वाराणसीत देव दीपावलीचा नयनरम्य सोहळा
21 लाख दिव्यांनी उजळून निघाले 84 घाट

गंगा महाआरतीने वेधले लक्ष
वाराणसी/24 नोव्हेंबर : महादेवाच्या वाराणसी(काशी) नगरीत आज ’देव दीपावली’चा भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगेचे 84 घाट तब्बल 21 लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले. जणू काही स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्याचा भास या वेळी होत होता. या ऐतिहासिक उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक वाराणसीत दाखल झाले होते.
देव दीपावली सोहळ्याचा शुभारंभ सायंकाळी 5.15 वाजता नमो घाटावर करण्यात आला. उत्तर प्रदेशचे पर्यटनमंत्री जयवीर सिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत गंगेच्या सर्व 84 घाटांवर दिवे प्रज्वलित करण्यात आले. परंपरेनुसार, सर्वप्रथम पंचगंगा घाटावरील हजारा प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर इतर घाटांवर दिवे लावण्यास सुरुवात झाली. यंदाच्या देव दीपावली उत्सवात एकूण 21 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. यापैकी 11 लाख दिवे उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने लावण्यात आले, तर उर्वरित 10 लाख दिवे काशीतील विविध संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने प्रज्वलित करण्यात आले. आदि केशव घाटापासून सामने घाटापर्यंत दिव्यांच्या रांगांनी गंगेचा संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
51 घाटांवर एकाच वेळी गंगा महाआरती
देव दीपावलीनिमित्त यंदा 51 घाटांवर एकाच वेळी भव्य गंगा महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत झालेल्या या आरतीमध्ये नमो घाट, दशाश्वमेध घाट, तुलसी घाट आणि अस्सी घाट यांसारख्या प्रमुख घाटांचा समावेश होता. एकाच वेळी प्रज्वलित झालेले दिवे आणि आरतीदरम्यान घुमणारे मंत्र यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. सर्वत्र ‘हर हर महादेव’चा जयघोष आणि गंगा आरतीचे मंत्र ऐकू येत होते.
लेझर आणि ड्रोन शोने वाढवली सोहळ्याची रंगत
दीपप्रज्वलन आणि गंगा आरतीसोबतच यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. चेतसिंह किल्ल्यावर सायंकाळी 7.20 ते 7.45 आणि त्यानंतर रात्री 8 ते 8.30 या वेळेत 3ऊ प्रोजेक्शन आणि लेझर शो सादर करण्यात आला. या माध्यमातून काशीची संस्कृती आणि धार्मिक वारसा आकर्षक पद्धतीने दाखवण्यात आला. रात्री 8 ते 8.10 या वेळेत ड्रोन शो आयोजित करण्यात आला. त्यानंतर रात्री 8.30 ते 8.45 या वेळेत ललिता घाटासमोर आतषबाजी करण्यात आली.





