वडिलांची सुरक्षा मुद्दाम काढली होती

राहुल गांधींचा मोठा दावा

हत्या व्हावी यासाठी वातावरण तयार केले

नवी दिल्ली/24 नोव्हेंबर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ते त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच त्यांच्या बहिण आणि काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी – वाड्रा यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. सोनिया गांधींनी नुकतेच त्यांचे बिलाँगिंग – अ जर्नी ऑफ लव्ह या आत्मचरित्राच्या निमित्ताने हा संवादाचा व्हिडीओ जारी करण्यात आला. यामध्ये राहुल गांधी यांनी देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान आणि त्यांचे वडील राजीव गांधींच्या हत्येबाबत मोठा दावा केला आहे. व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले की, वडिलांची सुरक्षा काढून घेतली गेली, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. ही सुरक्षा काढणे केवळ एखादा अपघात नव्हता. तर ते जाणीवपूर्वक केले गेले होते. त्यांची हत्या होण्यासाठीच तसे वातावरण तयार करण्यात आले होते. असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. सोनिया गांधींशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, त्या काळात जे काही घडत होते, ते स्पष्ट दिसत होते. याविषयी आपण आईला सांगितले होते. वडिलांशी सुरक्षेच्या मुद्यावरून या घटनेच्यापूर्वी वादही झाला होता, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी सोनिया गांधींनी राजीव गांधींनी त्यावेळी केलेल्या बिहार दौर्‍याचीदेखील आठवण करून दिली.सोनिया गांधी म्हणाल्या की, राहुल आपल्या वडिलांसोबत बिहार दौर्‍यावर गेले होते. त्यांनी हा दौरा अत्यंत भीतीदायक असल्याचे सांगितले. त्या वेळी राजीव विरोधी पक्षाचे नेते होते. ते उघड्या जीपमधून प्रवास करत होते. लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली होती. सुरक्षा व्यवस्था योग्य नसेल आणि एखाद्या राज्यात भाजप किंवा विरोधी पक्षाचे सरकार असेल, तर तेथे सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. या दौर्‍यावरून घरी परतल्यानंतर राहुलने मला सांगितले, पप्पांच्या सुरक्षेसाठी आपण काही केले नाही, तर मला माहीत आहे की मी लवकरच त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असेन. असा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला.
सोनिया गांधी म्हणाल्या की, राजकारणात येण्यापूर्वी राजीव गांधी हे वैमानिक होते. 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ते पंतप्रधान झाले होते. अनेक वर्षे राजीव गांधी बुलेटप्रूफ जॅकेट घालत होते, त्यांना यावेळी कडक सुरक्षा असायची. विरोधी पक्षांचे नेते याची खिल्लीही उडवत होते. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. विरोधी आघाडीने निवडणूक जिंकून सत्ता स्थापन केली.

Back to top button