शेतकर्याच्या कष्टाला योग्य दाम देणे हाच बाजार समितीचा ध्यास- सुनील पाटील गावंडे
दर्यापूर बाजारात नव्या हरभर्याला विक्रमी भाव

व्यापार्यांकडून हरभरा खरेदीला मिळतोय उत्तम प्रतिसाद
दर्यापूर/23 नोव्हेंबर – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हंगामातील हरभरा खरेदीचा धुमधडाक्यात शुभारंभ झाला असून काकडा येथील शेतकरी सचिन अपाले यांच्या हरभर्याला प्रतिक्विंटल 9,500 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे. सभापती सुनील पाटील गावंडे यांच्या हस्ते शेतकरी, अडते आणि खरेदीदारांचा शेला व पुष्पहार देऊन विशेष सत्कार करण्यात आला असून शेतकर्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळवून देणे हाच बाजार समितीचा मुख्य ध्यास असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
बाजार समितीत नवीन हरभर्याची आवक सुरू होताच पहिल्याच टप्प्यात चांगला दर मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. काकडा गावचे शेतकरी सचिन अपाले यांचा नवीन हरभरा विक्रीसाठी आला असता शिवर येथील अडते मंगेश देशमुख यांच्या अडतीवर अनिस कृषी केंद्र या खरेदीदाराने 9,500 रुपये प्रतिक्विंटल असा चढा भाव देऊन मालाची खरेदी केली. बाजार समितीत मालाला उत्तम भाव मिळावा, शेतकर्यांची आर्थिक प्रगती व्हावी आणि त्यांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी समिती सदैव प्रयत्नशील आहे. या सत्कारप्रसंगी संचालक राजेश शेठ राठी, असिफ भाई खान, प्रभाकर पाटील तराळ यांच्यासह व्यापारी, अडते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते.बळीराजाच्या कष्टाला बाजार समितीचा भक्कम आधार शेतकर्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळावा हाच दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा खरा ध्यास आहे. नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच हरभर्याला मिळालेला हा उच्चांकी दर बळीराजाचा उत्साह वाढवणारा आहे. बाजार समितीच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार आणि शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत तालुका काँग्रेस समिती अध्यक्ष तथा सभापती सुनील पाटील गावंडे यांनी व्यक्त केले.





