डॉ. भोजने रुग्णालयात तीन वर्षांत 132 बाळंतपणे

मनपाच्या जन्ममृत्यू विभागात पोलिसांची झाडाझडती

तीन वर्षांची संपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात

अमरावती /23 नोव्हेंबर- बाळ विक्री प्रकरणात डॉ. वैशाली भोजने यांच्या रुग्णालयातील तीन वर्षांतील 132 बाळंतपणांची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांनी महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात जाऊन 2014 ते 2016 या काळातील जन्म नोंदींची कसून तपासणी करून ही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आता 2016 ते 2026 या दहा वर्षांतील सर्व जन्म नोंदींची माहिती पुण्याच्या मुख्यालयातून मागविण्यात आली आहे.
शहरातील बुटीप्लॉट भागात डॉ. वैशाली भोजने यांनी 2014 मध्ये भोजने प्रसूतीगृह सुरू केले होते. या रुग्णालयात 2014 ते 2016 या तीन वर्षांत एकूण 132 मातांची प्रसूती झाल्याची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून फ्रेजरपुरा पोलिसांचे एक पथक शनिवारी महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात चौकशीसाठी गेले होते.
पोलिसांनी डॉ. वैशाली भोजने यांच्या रुग्णालयातून आतापर्यंत किती बालकांचा जन्म झाला याची माहिती महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाकडे मागितली आहे. महापालिकेकडे 2014 आणि 2015 तसेच 2016 या तीन वर्षांची कागदपत्रे मागितली असता या काळात 132 बालकांचा जन्म भोजने प्रसूतीगृहातून झाल्याची माहिती मिळाली आहे. तीन वर्षांची ही सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
2016 पासून जन्म आणि मृत्यूच्या नोंदी संगणकावर नोंदवल्या जात असल्याने पुढील सर्व माहिती पुणे येथील मुख्यालयात उपलब्ध आहे. त्यांच्या आदेशाशिवाय ही माहिती मिळू शकत नाही. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी ही संपूर्ण माहिती तपासामध्ये आवश्यक असल्याचे कारण सांगून 2016 ते 2026 या कालावधीत भोजने रुग्णालयात किती बाळांचा जन्म झाला याची माहिती मागवून पोलिसांना उपलब्ध करून द्यावी असे पत्र महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाच्या अधिकार्‍यांना दिले आहे. ही माहिती उपलब्ध व्हायला थोडा वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बारा वर्षांपूर्वी पहिल्या बाळाचा व्यवहार
पहिल्या बाळाचा व्यवहार बारा वर्षांपूर्वी म्हणजे 2014 मध्ये एका व्यक्तीसोबत झाला होता. त्यासाठी दुसर्‍या एका महिला डॉक्टरांनी मध्यस्थी केली होती. त्यामुळे त्याही महिला डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. परंतु ते बाळ नेमके कोणाकडे सोपवले होते याचा तपास आता पोलीस करीत आहेत. तसेच सहा महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका जोडप्याने भोजने यांच्या माध्यमातून बाळ विकत घेतले होते तेव्हा त्यांना फक्त जन्म दाखला मिळाला होता.

Back to top button