दिल्लीत नऊ पोलीस कर्मचार्यांवर चाकूने हल्ला
पाच जण गंभीर; चकमकीत हल्लेखोरालाही सहा गोळ्या झाडल्या

नवी दिल्ली /23 नोव्हेंबर: धक्कादायक आणि थरारक घटनेने आज (23 नोव्हेंबर) दिल्ली हादरली. आज दुपारी अडीचच्या सुमारास दिल्लीतील जामा मशीद पोलीस ठाण्यात एक गंभीर घटना घडली. कौटुंबिक वादाच्या संदर्भात पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलेल्या नबील नावाच्या व्यक्तीने अचानक पोलीस कर्मचार्यांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पाच पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर नबील पोलीस ठाण्यातून फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला.
समोर आलेल्या माहितीनुसार, नबीलला त्याच्या आई आणि बहिणीशी संबंधित एका कौटुंबिक वादाच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र पोलीस ठाण्यात गेल्यावर नबीलने अचानक पोलीस अधिकार्यांवर हल्ला केला, ज्यात ते जखमी झाले. जखमी कर्मचार्यांच्या मान आणि चेहर्यावर जखमा झाल्याने त्यांना तातडीने संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी जखमी पोलिसांना सर गंगाराम रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, हल्ल्यानंतर नबील पोलीस ठाण्यातून पळून गेला आणि पळताना त्याने एक दुचाकीही बळकावली. यावेळी सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या ‘ऑपरेशन्स युनिट’च्या पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. ऑपरेशन्स युनिटच्या पथकाने नबीलचा शोध घेत त्याला चितली कबर परिसरात गाठले आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र नबीलने पुन्हा एकदा अधिकार्यांवर हल्ला केला. अशा परिस्थितीत स्वसंरक्षणासाठी पोलिसांना नबीलवर गोळीबार करावा लागला. पोलिसांनी 8 राऊंड कमरेखाली झाडल्या, ज्यापैकी 6 गोळ्या नबीलच्या पायाला लागल्या. त्यानंतर जखमी झालेल्या नबीलच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी नबील हा सराईत गुन्हेगार असून 2022 मध्ये त्याच्याविरोधात दरियागंज पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 324 अंतर्गत मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांवर केलेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी आणि गोळीबार प्रकरणी जामा मस्जिद आणि चांदनी महल पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.





