रुग्णालयांची मनमानी रोखण्यासाठी राज्यात नवा कायदा
आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांची माहिती

मुंबई/23 नोव्हेंबर ः खासगी रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबविणे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता आणणे आणि रुग्णांना कायदेशीर हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार ‘महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना कायदा’ आणणार आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांना पैशांची मागणी न करता तातडीने प्राथमिक उपचार देणे बंधनकारक असेल. तसेच नोंदणीशिवाय कोणताही दवाखाना किंवा रुग्णालय सुरू करता येणार नाही. विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडून संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिली.
वैद्यकीय तंत्रज्ञान, उपचारपद्धती आणि रुग्णांच्या हक्कांविषयी वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन हा कायदा तयार करण्यात आला आहे. खासगी आरोग्यसेवा क्षेत्रात पारदर्शकता निर्माण करणे, रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आळा घालणे आणि सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्यसेवेचा किमान दर्जा राखणे, हे या कायद्याचे प्रमुख उद्देश आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारले जाऊ नयेत, यासाठीही कठोर तरतुदी प्रस्तावित आहेत.
आरोग्यमंत्री आबीटकर यांनी पावसाळी अधिवेशनात हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडले होते. मात्र, त्यातील काही तरतुदींवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्येही काही मुद्द्यांवर मतभिन्नता निर्माण झाली. त्यामुळे विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आले. आबीटकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने विधेयकातील तरतुदींवर राज्यातील नागरिक, सामाजिक संस्था, संघटना आणि स्वयंसेवी संस्थांकडून सूचना व सुधारणा मागविल्या. राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन संबंधितांशी चर्चा करण्यात आली तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हा कायदा विशेषतः गरीब आणि गरजू रुग्णांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. संयुक्त समितीने विविध बैठकांमधून नागरिक, संस्था आणि संघटनांची मते जाणून घेतली असून, त्यांच्या सूचनांचा विचार केला आहे. हिवाळी अधिवेशनात समितीचा अहवाल आणि विधेयक सादर केले जाईल. हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित कायद्याच्या कक्षेत अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, योग आणि निसर्गोपचार अशा विविध वैद्यकीय पद्धतींशी संबंधित संस्था आणण्यात येणार आहेत. खासगी, धर्मादाय आणि स्वायत्त संस्थांची रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखाने, डे-केअर केंद्रे, निदान केंद्रे, पॅथॉलॉजी लॅब तसेच वैद्यकीय प्रयोगशाळांनाही हा कायदा लागू असेल. मात्र, लष्कराची रुग्णालये, मनोरुग्णालये तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांना या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे.





