प्रा. विश्वजीत अंबादे यांना गोंडवाना विद्यापीठाच्या 14 व्या दीक्षांत समारंभात पीएच.डी. पदवी प्रदान

अमरावती/22 नोव्हेंबर  : शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्रा. विश्वजीत अंबादे यांनी अभिमानास्पद यश संपादन केले आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या 14 व्या दीक्षांत समारंभात दिनांक 15 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली.
या दीक्षांत समारंभाला महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उपकुलगुरू डॉ. श्रीराम कवाडे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रा. विश्वजीत अंबादे यांनी आपले संशोधन कार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना डॉ. एस. डब्ल्यू. राजुरकर आणि डॉ. जी. के. आवारी यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या संशोधन प्रबंधाचे शीर्षक असे आहे. या संशोधनामध्ये आधुनिक प्रिंटिंग तंत्रज्ञानातील प्रक्रियेवर परिणाम करणार्‍या विविध घटकांचा आणि या प्रक्रियेद्वारे तयार होणार्‍या वस्तूंच्या यांत्रिक गुणधर्मांवर होणार्‍या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. प्रिंटिंग प्रक्रियेचे अनुकूलन, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे तसेच अभियांत्रिकी आणि औद्योगिक क्षेत्रातील या तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. या यशाबद्दल डॉ. विश्वजीत अंबादे यांनी आपले संशोधन मार्गदर्शक डॉ. एस. डब्ल्यू. राजुरकर आणि डॉ. जी. के. आवारी यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे, प्रेरणेमुळे आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण करता आले. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी आई-वडील, सासू-सासरे, पत्नी आणि लाडक्या मुलाला दिले. कुटुंबीयांचे प्रेम, त्याग, आशीर्वाद, विश्वास आणि खंबीर पाठिंबा यामुळेच संशोधनाची ही वाटचाल यशस्वी होऊ शकली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. .विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, डॉ. विश्वजीत अंबादे हे अमरावतीचे सुप्रसिद्ध समाजसेवक तथा समाजभूषण राजूजी नन्नावरे आणि ’भीमपर्व’च्या प्रकाशिका सौ. सुरेखाताई नन्नावरे यांचे जावई आहेत. तसेच ते एकता रॅली आयोजन समिती, अमरावती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक ’भीमपर्व’ यांच्या संपादक मंडळाचे प्रमुख सदस्य म्हणून सामाजिक व वैचारिक क्षेत्रात योगदान देत आहेत. डॉ. विश्वजीत अंबादे यांची ही शैक्षणिक कामगिरी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण यश असून, विद्यार्थ्यांसाठी, युवा अभियंत्यांसाठी आणि संशोधन क्षेत्रात कार्य करू इच्छिणार्‍या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

Back to top button