अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्या

आ. राजेश वानखेडे यांची मागणी

-विधिमंडळात उपस्थित केला औचित्याच्या मुद्दा
तिवसा / 3 जुलै: अतिवृष्टीमुळे तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची नोंद असून त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नूकसान झाले आहे. त्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आता खरिप हंगामात शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. तिवसा तालुक्यातील शेतकर्‍यांना या आर्थिक संकटातून सोडविण्यासाठी आणि पुढील हंगामात शेती करताना त्यांना मदत मिळावी या करिता शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी आज विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान केली.
तिवसा तालुक्यातील महसूल मंडळामधील वरखेड, तारखेड, उंबरखेड, धामंत्री, वर्‍हा, शिरजगाव मोझरी, शिवणगाव, फत्तेपूर या गावांमध्ये 28 ते 31 मे दरम्यान अतिवृष्टी झाली. मान्सून पूर्व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या कांदा, तीळ, भुईमूग, ज्वारी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार राजेश वानखडे यांनी यंत्रणेसह प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करण्याची प्रक्रिया पार पाडली. या अवकाळीच्या तडाख्याने पीक हातून गेल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झालेला होता.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे आमदार राजेश वानखडे यांनी अवगत केलेले होते. जिल्हाधिकार्‍यांनीही पंचनामे करून नुकसानीचा शाश्वत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. तिवसा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी याकरिता आ. वानखडे यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू आहे. आता याविषयी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार राजेश वानखेडे यांनी यांनी याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button