वर्धा जिल्ह्यातून पहिले बालक पोलिसांच्या ताब्यात
डॉ.भोजने दाम्पत्याच्या प्रसूतीगृहातील नवजात तस्करी टोळीचा पर्दाफाश

तळेगावच्या छाप्यातून एक वर्षाचे बालक सुखरूप
गुप्त दस्तऐवजातून समोर आले धक्कादायक वास्तव
महिला डॉक्टरच्या मध्यस्थीने ठरला होता सौदा
पुरावे नष्ट करण्यासाठी नोंदवह्यांची फाडाफाड
अमरावती/18 नोव्हेंबर– राजापेठ बुटी प्लॉट परिसरातील भोजने प्रसूतीगृहातून एक वर्षापूर्वी विक्री केलेले पहिले मूल तपास पथकाने वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथून आज ताब्यात घेतले. याप्रकरणी संबंधित दाम्पत्यासह बालकाला अमरावती येथे आणण्यात आले असून, तपासात सापडलेल्या करारनाम्यामुळे एका महिला डॉक्टरचे नाव पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राजापेठ बुटी प्लॉट येथील भोजने प्रसूतीगृहात नवजात बालकांच्या विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस दलाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेच्या महिला नेत्या कोमल बद्रे, वर्षा भोयर यांनी हा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर विशेष तपास पथकाने सखोल चौकशी सुरू केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल वसंतराव भोजने हे प्रकरण उघड होताच पसार झाले होते. तब्बल 25 दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी या दाम्पत्याला बेड्या ठोकल्या. तपासात सहकार्य करत नसल्याने न्यायालयाने त्यांना दोन वेळा पोलिस कोठडी सुनावली असून, 20 नोव्हेंबरपर्यंत ते कोठडीत राहणार आहेत.
पोलिस कोठडीतील कसून चौकशीदरम्यान तपास पथकाच्या हाती एक महत्त्वाचा करारनामा लागला आहे. या कागदपत्रानुसार एका महिला डॉक्टरच्या मध्यस्थीने 50 हजार रुपयांच्या मोबदल्यात एका सोनाराला हे मूल दिल्याचा संशय बळावला आहे. संबंधित जन्मदाती माता नोकरी करत असल्याने तिला बाळाचा सांभाळ करणे शक्य नव्हते, अशी माहितीही समोर आली आहे. हा धागा हाती लागताच तपास पथकाने वर्धा जिल्ह्यातील तळेगाव ग्रामीण भागात सापळा रचला. तेथून एका दाम्पत्याला ताब्यात घेत त्यांच्याकडे असलेले 1 वर्षाचे मूल सुरक्षितपणे ताब्यात घेतले. गेल्या नोव्हेंबर महिन्यात भोजने रुग्णालयात जन्मलेले हे मूल काही दिवसांतच या दाम्पत्याकडे सोपवण्यात आले होते. पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खास महिला अधिकार्यांचे पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आज दुपारी हे पथक संबंधित दाम्पत्य आणि बालकाला घेऊन शहरात दाखल झाले. या कारवाईला पोलिस उपायुक्त यांनी दुजोरा दिला असून, ताब्यात घेतलेल्या दाम्पत्याची कसून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तपासातून आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तक्रारदार महिला नेत्यांच्या आरोपांना बळ
शिवसेनेच्या महिला नेत्या कोमल बद्रे, वर्षा भोयर यांनी या बालक विक्री प्रकरणाविरोधात आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता वर्धा जिल्ह्यातून पहिले मूल ताब्यात आल्याने त्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिस तपासाची व्याप्ती वाढल्याने या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांचे धाबे दणाणले आहेत.
महिला डॉक्टरच्या भूमिकेवर संशयाची सुई
तपासात सापडलेल्या करारनाम्यामुळे शहरातील एका महिला डॉक्टरचे नाव पुढे आले आहे. विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था परिसरात या डॉक्टरचा दवाखाना असून, 10 ते 12 वर्षांपूर्वीही अशाच एका बालकाच्या व्यवहाराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित महिला डॉक्टरला लवकरच चौकशीसाठी पोलिस ठाण्यात पाचारण केले जाणार आहे.
बनावट कागदपत्रांची कसून तपासणी सुरू
प्रसूतीगृहातील नोंदवह्या आणि कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात खाडाखोड झाल्याचे उघड झाले आहे. अनेक महत्त्वाची पाने फाडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास पथकाला आहे. या फाडलेल्या कागदपत्रांची आणि नोंदवह्यांची स्वतंत्रपणे बारकाईने तपासणी सुरू असून, यातून अनेक गुपिते बाहेर येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.





