मतदार हक्कांच्या रक्षणासाठी काँग्रेसचा एल्गार

मत वाचवा देश वाचवा अभियानाला अंबानगरीत प्रारंभ

गांधी चौकातून उपक्रमास सुरुवात

अमरावती/17 नोव्हेंबर- मतदार यादीतील कथित घोळ, पात्र मतदारांची नावे वगळणे आणि मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या आरोपांवरून काँग्रेसने अमरावतीत ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियान सुरू केले आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहावा, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने मंगळवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता गांधी चौकात शहरातील पहिली चौपाल घेण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी नागरिक, मजूर आणि कामगारांशी थेट संवाद साधत मतदार यादीतील त्रुटी आणि मतदानाच्या अधिकाराबाबत चर्चा केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार या अभियानाची सुरुवात करण्यात आली. मतदार यादीत पात्र नागरिकांची नावे वगळली जाणे, मतदारांच्या नावांमध्ये कथित फेरफार होणे आणि मतदान प्रक्रियेवर निर्माण झालेले प्रश्न याबाबत काँग्रेस नेत्यांनी चिंता व्यक्त केली. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाची संधी मिळणे हा त्याचा मूलभूत लोकशाही अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विलास इंगोले आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी मतदारांचे महत्त्व स्पष्ट केले. प्रत्येक मत देशाचे भविष्य ठरवते. त्यामुळे कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘ज्ञानेश किसका लाल है, मोदी का दलाल है’, ‘मोदी हटाओ, देश बचाओ’, ‘ज्ञानेश कुमार हटाओ, देश बचाओ’, ‘वोट चोर गद्दी छोड़’ आणि ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील प्रत्येक प्रभागात चौपाल घेऊन नागरिकांशी संवाद साधण्याची घोषणा काँग्रेसने केली. कार्यक्रमाचे आयोजन विलास इंगोले यांनी केले. यावेळी महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे, उपाध्यक्ष संजय वाघ, जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगले, शहर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष नितीन काळे, पार्षद विक्की वानखडे, संजय शिरभाते, सुरेश रतावा, विजय वानखडे, सादिक शाह, रफीक चिकुवाले, स्वराज पोते, प्रभाकर वालसे, महेश व्यास, जावेद साबीर, अशफाक खान, सतीश गवई यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Back to top button