15 दिवसांत गतिरोधक बसवा, अन्यथा दर्यापूर-मूर्तिजापूर महामार्ग रोखणार
युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला आक्रमक इशारा

दर्यापूर /16 नोव्हेंबर : दर्यापूर-मूर्तिजापूर राज्य महामार्गावरील गणेशपूर फाटा, गायवाडी फाटा आणि पनोरा फाटा येथे वारंवार होणार्या अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दर्यापूर-मूर्तिजापूर हा अत्यंत वर्दळीचा राज्य महामार्ग असून या मार्गावरून दिवस-रात्र जड वाहने आणि प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार, असा संतप्त सवाल अंकुश पाटील कावडकर यांनी उपस्थित केला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ कागदोपत्री आश्वासनांचा विषय नसून तो थेट जनतेच्या जीवाशी निगडित आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन येत्या 15 दिवसांच्या आत या तिन्ही ठिकाणी नियमानुसार गतिरोधक बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 15 दिवसांची मुदत देऊनही प्रशासनाने मागणीची दखल घेतली नाही आणि प्रत्यक्ष कार्यवाही केली नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन दर्यापूर-मूर्तिजापूर राज्य महामार्ग रोखून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अंकुश पाटील कावडकर यांनी दिला आहे.जनतेच्या जीवाशी खेळणार्या निष्क्रिय कारभाराला आता थारा दिला जाणार नाही. अपघात झाल्यानंतर मदतीला धावण्यापेक्षा अपघात होऊच नयेत यासाठी प्रशासनाने वेळीच जागे व्हावे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या 15 दिवसांच्या मुदतीत कार्यवाही झाली नाही, तर रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही! असा ठणकावून इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, शिवसेना विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, युवासेना तालुकाप्रमुख सागर गिर्हे, शिवसेना उपतालुकाप्रमुख भास्कर धोटे, शिवसेना उपशहर प्रमुख दीपक बगाडे, युवासेना उपतालुका समन्वयक सतीश जामनिक, युवासेना उपशहरप्रमुख शुभम विल्हेकर, पनोरा ग्रामपंचायत सरपंच सुधीर टोळे, गायवाडी ग्रामपंचायत सरपंच विजय जामनिक, सुनील पाचडे, दीपक साखरे, दिलीप काळे, संतोष फुके, अजय कातखेडे, राजेश वाकोडे, पंकज गवळी, मनोज लाड, मनोज बनसोड, विक्रम तेटु, गजानन तेटु, दीपक गवई, विजय वानखडे, विकास ढोंगे, निलेश वक्ते, महेश कावडकर, मनोहर कावडकर, मंगेश कावडकर, उज्वल कावडकर, अनिकेत चौधरी तसेच शिवसैनिक आणि असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.





