खासगी बसच्या भाडेवाढीवरून वाद पेटला
वाढत्या खर्चामुळे भाड्यात बदल करावा लागतो

प्रवाशांची लूट होत नसल्याचा संघटनेचा दावा
अमरावती /16 नोव्हेंबर– दिवाळीच्या काळात खासगी प्रवासी बसच्या भाड्यात होणार्या वाढीवरून प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच अमरावती जिल्हा प्रवासी बस संघटनेचे अध्यक्ष मेराज खान पठाण यांनी बसचालकांची बाजू मांडली आहे. एकाच दिशेने प्रवाशांची गर्दी आणि परतीच्या प्रवासात रिकाम्या बस आणण्याचा खर्च यामुळे सणासुदीच्या काळात भाड्यात बदल करावा लागतो. प्रवाशांकडून लूट किंवा जबरदस्तीने वसुली केली जात नसल्याचे सांगत त्यांनी बसमालकांवरील आरोप फेटाळले आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या शहरांतून लहान शहरांकडे येणार्या खासगी बस प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या असतात. मात्र, सण संपल्यानंतर परतीच्या प्रवासात प्रवाशांची संख्या कमी होते. त्यामुळे अनेक बस रिकाम्या आसनांसह धावतात. अशा वेळी इंधन आणि बस चालवण्याचा संपूर्ण खर्च बसमालकांना सहन करावा लागतो. गर्दीच्या काळात जादा बसगाड्यांची व्यवस्थाही करावी लागते. त्यामुळे दोन्ही दिशांतील प्रवाशांची संख्या आणि खर्च लक्षात घेऊन भाडे ठरवावे लागते, असे मेराज खान पठाण यांनी सांगितले. खासगी बसमध्ये आरामदायी आसने, वातानुकूलित व्यवस्था, भ्रमणध्वनी चार्जिंग, आंतरजाल, उशा, पांघरूण आणि भोजन अशा सुविधा दिल्या जातात. याशिवाय वाहन कर, विमा, पथकर, इंधन, टायरची देखभाल, कर्मचार्यांचे वेतन आणि बँकेचे हप्ते असे अनेक खर्च असतात. पठाण यांच्या माहितीनुसार, अमरावती-पुणे मार्गावर कमाल 3 हजार 800 रुपये, तर अमरावती-मुंबई मार्गावर 5 हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. वर्षभर 700 ते 800 रुपयांत सेवा देणार्या बसमालकांना सणासुदीच्या काळात खर्चानुसार भाड्यात बदल करावा लागतो. विमान प्रवासाचे भाडे 37 ते 47 हजार रुपयांपर्यंत वाढले तरी विरोध होत नाही. मात्र, खासगी बसच्या भाडेवाढीवरून लगेच लुटीचे आरोप केले जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण बसचालकांची बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संघटनेच्या पदाधिकार्यांनी या आरोपांना विरोध दर्शविला आहे.





