मुंबई-नागपूरदरम्यान चार विशेष रेल्वेगाड्या

दिवाळी आणि छठपूजेनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय

अमरावती / 15 नोव्हेंबर – दिवाळी, पूजा आणि छठपूजेच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूरदरम्यान 4 विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नागपूरसाठी या गाड्या धावणार असून, प्रत्येकी 2 फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांना अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आल्याने विदर्भातील प्रवाशांना मुंबईला जाण्या-येण्यासाठी मोठी सोय होणार आहे. सणासुदीच्या काळात मुंबई आणि नागपूरदरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी क्रमांक 01125 ही 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.25 वाजता मुंबईहून सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01126 ही 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.10 वाजता नागपूरहून सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 8.05 वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. दुसरी लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी क्रमांक 01129 ही 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.25 वाजता मुंबईहून सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजता नागपूरला पोहोचेल.

Back to top button