आज मुख्याधिकार्‍यांना द्यावा लागणार लेखी खुलासा

मोर्शी नगर परिषदेतील मटण मेजवानीवरून राजकीय खळबळ

जिल्हाधिकार्‍यांनी बजावली आहे कारणे दाखवा नोटीस
मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली नाराजी
दुष्काळात मटण मेजवानीमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

मोर्शी/15 नोव्हेंबर – राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना मोर्शी नगर परिषदेत मुख्याधिकार्‍यांच्या परवानगीने पार पडलेल्या मटण मेजवानीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या प्रकरणी मुख्याधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे जनतेच्या प्रश्नांपेक्षा मेजवानी आणि राजकीय कुरघोड्यांना महत्त्व दिले जात असल्याची चर्चा रंगली असून मंत्री संजय शिरसाट यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाई आणि नैसर्गिक आपत्तीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा कठीण काळात मोर्शी नगर परिषदेच्या कार्यालयातच मुख्याधिकार्‍यांच्या परवानगीने मटण मेजवानी पार पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. या मेजवानीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर वेगाने पसरल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास शाखेने गंभीर दखल घेतली आहे. 14 नोव्हेंबर 2026 रोजी वृत्तवाहिन्यांवर याबाबतच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मोर्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय कार्यालयात झालेला हा प्रकार प्रशासकीय पदास शोभणारा नसून त्यामुळे कार्यालयाची प्रतिमा मलिन झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मुख्याधिकार्‍यांभोवती यापूर्वीपासूनच वादाचे वलय असल्याने या घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
दुसरीकडे या प्रकरणावरून मोर्शीच्या राजकारणात चांगलीच जुंपली आहे. ज्यांचा मोर्शी नगर परिषदेशी किंवा शहराशी कोणताही संबंध नाही अशी बाहेरील राजकीय मंडळीही या वादात उगाचच हस्तक्षेप करत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. एका बाजूला सत्तेत मित्रपक्ष म्हणून सोबत राहायचे आणि दुसर्‍या बाजूला मोर्शी नगर परिषदेत शिंदे शिवसेनेची कोंडी करायची असे धोरण भाजपकडून राबवले जात असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मित्रपक्षाकडूनच शिंदे शिवसेनेचे खच्चीकरण केले जात असल्याच्या चर्चांना या प्रकरणामुळे उधाण आले आहे.दरम्यान या मेजवानीची छायाचित्रे सर्वत्र पसरल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनीही या प्रकारावर भाष्य करत घडलेला प्रकार चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. दुष्काळाच्या संकटात जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी मेजवानी आणि राजकीय श्रेयवादात रमणार्‍यांनी जनतेला उत्तर द्यावे अशी तीव्र भावना मोर्शीतील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

मुख्याधिकार्‍यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील तरतुदीनुसार शासकीय सेवकास अशोभनीय ठरेल असे वर्तन न करण्याची अपेक्षा असते. त्यामुळे या प्रकरणी आवश्यक कागदपत्रे आणि पुराव्यांसह सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत समक्ष हजर राहून सविस्तर लेखी खुलासा सादर करावा. मुदतीत खुलासा न मिळाल्यास अथवा समाधानकारक नसल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिला आहे.

Back to top button