सुवर्णपदक विजेत्या राष्ट्रीय खेळाडूचा अपघातात मृत्यू

आरोपी दुचाकीस्वाराला पोलिसांनी सोडल्याचा आरोप

संतप्त कुटुंबियांचे डीसीपी कार्यालयासमोर आंदोलन
मृतक अवनीचा पार्थिव देहही रुग्णवाहिकेतून डीसीपी कार्यालयात

नागपूर/12 नोव्हेंबर :  नागपूरमध्ये रस्ते अपघातात राष्ट्रीय खेळाडू अवनी मुकेश बघेल (वय 17) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव दुचाकीच्या धडकेत अवनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी दुचाकीस्वाराला पोलिसांनी सोडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह खेळाडूंनी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली थेट डीसीपी कार्यालयासमोर आंदोलन केले. विशेष म्हणजे, न्यायाच्या मागणीसाठी अवनीचा पार्थिव देहही रुग्णवाहिकेतून डीसीपी कार्यालयासमोर आणण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील संघर्षनगर चौकात 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ते अपघात झाला. भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत 17 वर्षीय अवनी मुकेश बघेल हिचा मृत्यू झाला. अवनी ही सेपक टकरा या खेळातील राष्ट्रीय स्तराची खेळाडू होती. तिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व करत 7 ते 8 वेळा पदके मिळवली होती. तसेच महाराष्ट्राकडून 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत सुवर्णपदकांना ही गवसणी घातली होती. खेलो इंडिया स्पर्धेतही तिने आपल्या खेळाची छाप पाडली होती.

Back to top button