बनावट चावीने दुचाकी पळवणारी टोळी गजाआड
शहरात दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अमरावती /11 नोव्हेंबर– बनावट चावीचा वापर करून दुचाकी पळवणार्या एका सराईत टोळीचा गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने पर्दाफाश केला असून, गौरव दिनेश सोनवणे आणि प्रथमेश उर्फ दुर्लभ राजु हरदे या दोघांना ताब्यात घेत लाखो रुपयांच्या चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्याने वाहनचोरी करणार्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. राजपूत धाबा चौकाजवळ एक जण चोरीची दुचाकी विकण्यासाठी गिर्हाईक शोधत असल्याची पक्की खबर गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला गस्तीदरम्यान मिळाली होती. ही कुणकुण लागताच पथकाने तातडीने सापळा रचून हालचाली सुरू केल्या. पोलिसांची चाहूल लागताच संशयित व्यक्ती पळण्याच्या तयारीत असताना दबा धरून बसलेल्या पथकाने झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीवर बनावट क्रमांक टाकण्यातआला होता आणि वाहनाची कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे उपलब्ध नव्हती. वाहनाचा सांगाडा क्रमांक आणि यंत्राचा क्रमांक तपासून खात्री केली असता, हे वाहन चोरीचे असून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयित आरोपी गौरव दिनेश सोनवणे (वय 20 वर्षे, रा. जयसियारम नगर, अमरावती) आणि या गुन्ह्यात त्याला थेट साथ देणारा साथीदार प्रथमेश उर्फ दुर्लभ राजु हरदे (वय 20 वर्षे, रा. विलास नगर, गल्ली क्र. 2, अमरावती) या दोघांना पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले. चौकशी दरम्यान या भामट्यांनी बनावट चाव्यांचा वापर करून गाडगेनगर पोलीस स्टेशन, वलगाव पोलीस स्टेशन, फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन, सरमसपुरा पोलीस स्टेशन, परतवाडा पोलीस स्टेशन, अकोट पोलीस स्टेशन तसेच वरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वाहने लंपास केल्याची कबुली दिली. गजबजलेल्या बाजारात किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्य गाड्यांवर ही टोळी पाळत ठेवत असे. बनावट चावी लावून अवघ्या काही क्षणात हँडल तोडून गाड्या गायब करायच्या आणि नंबर प्लेट बदलून त्या ग्रामीण भागात विक्री करायच्या, असा त्यांचा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांनी वेळेवर कारवाईचा फास आवळल्याने अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झालेल्या वाहनांचा छडा एकाच वेळी लागला आहे.





