9 महिने पत्ते खेळून दारू पितात
शेतकरी केवळ 3 महिने काम करतात आणि

* भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान
* शेतकरी संघटनांच्या आक्रमणानंतर व्यक्त केली दिलगिरी
भोपाल/11 नोव्हेंबर – शेतकरी वर्षातील केवळ तीन महिनेच शेतात राबतात आणि उरलेले नऊ महिने पत्ते खेळणे, गुटखा खाणे, दारू पिणे व गांजा ओढणे यात घालवतात, असे वादग्रस्त विधान करणारे मध्य प्रदेशातील रेवा मतदारसंघाचे भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांनी अखेर जाहीर माफी मागितली आहे. चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले, शेतकर्यांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला.मऊगंज जिल्ह्यातील एका गोवर्धन पूजा कार्यक्रमात सोमवारी बोलताना मिश्रा यांनी हे विधान केले होते. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. व्हिडीओमध्ये खासदार मिश्रा शेतकर्यांना उद्देशून म्हणताना दिसत आहेत की, आजचा शेतकरी केवळ तीन महिने काम करतो. उरलेले नऊ महिने तो पत्ते खेळणे, गुटखा खाणे, दारू पिणे आणि जय भोले म्हणण्यातच वाया घालवतो. आजच्या शेतकर्यांना आरामाची सवय लागली असून ते पूर्वीसारखे कष्ट करत नाहीत, असा दावाही त्यांनी या भाषणात केला होता. खासदारांच्या या विधानावर शेतकरी संघटना आणि काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाने मिश्रा यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. काही शेतकर्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे मऊगंज जिल्हाध्यक्ष नरेंद्र सिंह यांनी खासदारांच्या दाव्याचा समाचार घेत म्हटले, शेतीचे काम केवळ तीन महिन्यांचे नसते. शेतकरी वर्षभर पेरणी, तण काढणे, सिंचन, कापणी आणि पुढील हंगामाची तयारी या कामांमध्ये गुंतलेला असतो.





