दिवाळीच्या फटाक्यांत घरफोडीची संधी साधली

1 लाख 35 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

आशा विहार वसाहतीतील बंद घर चोरट्यांचे लक्ष्य

अमरावती/10 नोव्हेंबर – दिवाळीनिमित्त कुटुंबीय घराला कुलूप लावून फटाके फोडण्यासाठी बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंग रोड परिसरातील आशा विहार वसाहतीत ही घटना घडली.
संतोष श्रीधर अठऊ (45) यांच्या घरातून चोरट्याने सुमारे 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. घरातील मंदिराजवळ ठेवलेल्या पेटीतून 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष श्रीधर अठऊ हे आपल्या कुटुंबासह आशा विहार वसाहतीत राहतात. दिवाळीच्या दिवशी सायंकाळी 7.45 ते रात्री 9.30 या वेळेत अठऊ कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर फटाके फोडण्यासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामानाची तपासणी करून मंदिराजवळ ठेवलेल्या पेटीतील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. कुटुंबीय घरी परतल्यानंतर पेटीतील मंगळसूत्र दिसून आले नाही. सुरुवातीला घरातील सर्व सदस्यांनी शोधाशोध केली; मात्र दागिना कुठेही मिळाला नाही. अखेर संतोष अठऊ यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 (अ), 331 (4), 380 आणि 475 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Back to top button