अंबानगरीत रंगणार कलाल समाजाचा मेळावा

कृषी रोजगार मेळाव्यासह वधूवर परिचय संमेलन

क्रीडा स्पर्धांसह देशभरातील समाजबांधव एकत्र जमणार

13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान शहरात सोहळ्याचे आयोजन

अमरावती/10 नोव्हेंबर – अंबानगरी अमरावतीत 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय कलाल कलार समाज समिती आणि अखिल भारतवर्षीय हैहय कलचुरी महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय भव्य महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शेतकरी मार्गदर्शन मेळावा, तरुणांसाठी रोजगार उद्योग संधी, थेट संवादातून जोडीदार निवडणारे वधूवर संमेलन आणि राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा पार पडणार असून देशभरातून हजारो समाजबांधव शहरात एकत्र दाखल होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुनील खराटे यांनी आपली मातृभूमीशी बोलतांना दिली.
अखिल भारतीय कलाल कलार समाज समितीचे अध्यक्ष सुनील खराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाकुंभाचा मुख्य उद्देश केवळ पारंपरिक गाठीभेटींपुरता मर्यादित नसून तरुण, शेतकरी आणि उद्योजकांच्या प्रगतीला थेट बळ देणे हा आहे. त्यामुळेच आधुनिक काळाची गरज ओळखून या कार्यक्रमाची संपूर्ण आखणी केली आहे.पहिल्या दिवशी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात शेतकरी व कृषी मेळावा रंगेल. या मेळाव्यात तज्ज्ञ मंडळी शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान, पूरक उद्योग आणि नव्या पद्धतीचे मार्गदर्शन करतील. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता याच सभागृहात रोजगार, उद्योग आणि व्यवसाय मेळावा भरेल. यात अनुभवी उद्योजक आणि तरुण थेट समोरासमोर बसून नव्या व्यवसायाच्या संधींवर सविस्तर चर्चा करतील. याच दिवशी सायंकाळी 5 वाजता होणार्‍या वधूवर मेळाव्यात केवळ पत्रिका न पाहता उपवर मुला-मुलींना एकमेकांशी बोलून जोडीदार ठरवता येणार आहे. तसेच 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या भव्य मैदानावर महिला व पुरुषांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा रंगणार असून राज्यातील अनेक संघ यात भिडतील. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी समितीचे पदाधिकारी सुनील राऊत, सचिन पहाडे, सुरेंद्र जयस्वाल, विनोद भामकर, उमेश करोडदेव, गजानन कोल्हटकर दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

15 नोव्हेंबरला महासंमेलनाचा भव्य सोहळा

माजी खा. नवनीत राणा यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महासंमेलन रंगेल. उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे करतील. यावेळी मंत्री संजय राठोड, जयनारायण चौकसे, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आ. रवी राणा, आ. संजय खोडके, प्रताप अडसड, उमेश यावलकर, आ. गजानन लवटे, महापौर श्रीचंद तेजवानी, जगदीश गुप्ता, डॉ. सुनील देशमुख, डॉ. नितीन धांडे, राजेंद्र मेवाडा, अजय जैस्वाल, ड. एम. एल. आय. हरिराम राय, अंजली नाईक, राजेंद्र जयस्वाल, सुनील चौथमल, पूनम चौधरी उपस्थित राहतील

 

Back to top button