15 राज्यांतील डॉक्टरांचा अमरावतीत क्रीडा महाकुंभ
25 ते 29 नोव्हेंबरदरम्यान रंगणार विविध स्पर्धा

700 हून अधिक डॉक्टरांचा सहभाग निश्चित
अमरावती/10 नोव्हेंबर – देशातील 15 राज्यांतील 700 हून अधिक डॉक्टरांच्या सहभागाने अमरावतीत 25 ते 29 नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय क्रीडा महाकुंभ रंगणार आहे. भारतीय वैद्यकीय संघटनेच्या वतीने आयोजित या महाकुंभात क्रिकेट, बुद्धिबळ, जलतरण, टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉलसह विविध खेळांच्या स्पर्धा होणार असून, 10 आणि 21 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धाही आकर्षण ठरणार आहेत.
या आयोजनासाठी देशभरातून डॉक्टरांची नोंदणी सुरू असून, 700 हून अधिक प्रवेश निश्चित झाले आहेत. 25 आणि 26 नोव्हेंबरला क्रिकेट स्पर्धांनी महाकुंभाला सुरुवात होईल. तर 27 नोव्हेंबरपासून विविध खेळ आणि धावण्याच्या स्पर्धा रंगतील. जिल्हा स्टेडियम, इंदूर स्टेडियम, हव्याप्रमं आणि पीडीएमएमसीच्या मैदानांसह विविध ठिकाणी सामने होतील. संयोजक डॉ. वसंत लुंगे, सहसंयोजक व अमरावती भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिनेश वाघाडे, आयोजन अध्यक्ष डॉ. जयप्रकाश बनकर आणि सचिव डॉ. सिकंदर आडवाणी तयारीवर लक्ष ठेवून आहेत. अर्थ समितीत डॉ. पंकज घुंडियाल, डॉ. नितीन सेवानी, डॉ. रोहन बोबडे, डॉ. परीक्षित ठाकरे, डॉ. गौरव गोहाड, डॉ. संदीप दानखडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. पंकज बारबडे, डॉ. अमेय सदर यांचा समावेश आहे. प्रसिद्धी समितीत डॉ. नीरज मुरके, डॉ. सिकंदर आडवाणी, डॉ. सुशील राजभूत, डॉ. हर्षदा मातकर, डॉ. तेजल सोनार कार्यरत आहेत. डॉ. केतन देसाई, डॉ. अनिल नायक, दिलीप भानुशाली, डॉ. शर्वरी दत्ता, डॉ. पीयूष जैन, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. संतोष कदम, डॉ. विक्रांत देसाई, डॉ. मंजुषा गिरी आणि डॉ. अमोल गीते यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. आयोजनासाठी विविध समित्या मेहनत घेत आहेत.
अनेक खेळांचा महोत्सव
या महाकुंभात क्रिकेट, बुद्धिबळ, जलतरण, कॅरम, टेबल टेनिस, टर्फ फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस, गोल्फ आणि सायकलिंगसह विविध स्पर्धा होतील. 10 आणि 21 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धाही होणार आहेत. डॉक्टरांना अमरावतीतील पर्यटनस्थळांची माहिती देऊन शहरात येण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.





