रामपुरी कॅम्पमध्ये बांधकामाधीन कमान कोसळली

चार कामगार गंभीर जखमी

महापौरांच्या उपस्थितीत झाले होते भूमिपूजन; दर्जा आणि निकृष्ट साहित्यावर प्रश्न चिन्ह

अग्निशमन पथकाने मोठ्या शिताफीने अडकलेल्या मजुरांना काढले बाहेर

अमरावती/10 नोव्हेंबर – गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या रामपुरी कॅम्प परिसरातील मिठू चक्कीजवळ सच्चूराम दरबारच्या निर्माणाधीन स्वागत प्रवेशद्वाराचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक या स्वागत द्वाराचा वरचा स्लॅब मोठा आवाज करत भरभरावरून खाली कोसळला. स्लॅब कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांची मोठी धावपळ सुरू झाली. घटनेच्या वेळी घटनास्थळावर काम करत असलेले जक्कीर भाई, शेख जहीर, शेख मुजफ्फर, शेख जहीर, अब्दुल जमीर, सज्जन राव, तोजिम, चंदू आठवले, फिरोज शेख यांची आई, शेख आतिश हे कामगार उपस्थित होते. यापैकी चार कामगार थेट कोसळलेल्या स्लॅबच्या ढिगार्‍याखाली अडकले.
घटनेची माहिती समाजसेवक आशिष लुल्ला यांनी तत्काळ अग्निशमन दलाला फोनवरून दिली. त्यानंतर पाळी प्रमुख निखिल बाठे आणि अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अग्निशामक वाहने तातडीने रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी कटर आणि सबलीच्या मदतीने मलबा हटवण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगार्‍याखाली अडकलेल्या जमीर खां शमशेर खां (वय 35 वर्षे, रा. अरकात कॉलनी), मोहम्मद ऐकाम मो. शागीर (वय 27 वर्षे, रा. धरमकाटा वलगाव रोड), शेख जमीर (वय 40 वर्षे, रा. लालखडी), शेख मुजफर (वय 26 वर्षे, रा. लालखडी) या चार मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
बाहेर काढण्यात आलेल्या चारही जखमी मजुरांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार दिल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन झाले होते आणि बांधकाम पूर्णत्वाकडे जात असतानाच हा अपघात घडल्याने निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि प्रशासकीय देखरेखीच्या अभावावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दाट वस्तीत सुरक्षेचा पूर्ण फज्जा – रामपुरी कॅम्प हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा मानला जातो. अशा गजबजलेल्या भागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या एवढ्या मोठ्या प्रवेशद्वाराच्या बांधकामादरम्यान कोणतीही सुरक्षा जाळी अथवा बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. मजुरांच्या सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्यामुळेच हा मोठा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
बांधकामाच्या दर्जावर नागरिकांचे गंभीर प्रश्न – महापौरांच्या प्रभाग क्षेत्रात सुरू असलेल्या या कामाचे काही दिवसांपूर्वीच भूमिपूजन झाले होते. बांधकाम पूर्ण होण्याच्या बेतात असताना स्लॅब कोसळल्याने वापरण्यात आलेले सिमेंट, लोखंड व इतर साहित्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
जखमी मजुरांवर तातडीने खासगी उपचार
ढिगार्‍याखालून बाहेर काढलेल्या जमीर खां शमशेर खां, मोहम्मद ऐकाम मो. शागीर, शेख जमीर आणि शेख मुजफर यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले. मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लागलीच खाजगी रुग्णालयात हलवून दाखल करण्यात आले.

अग्निशमन दलाचे धाडसी बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांच्या नेतृत्वात केंद्रप्रमुख प्रेमानंद सोनकांबळे, चालक संतोष डोईफोडे, आकाश राऊत, सलीम सय्यद तसेच जवान सुरज लोणारे, राजेश गजबे, राहुल घोडे, विकी हिवराळे ढोके, शहबाज यांनी तत्परतेने मदतकार्य राबवले. अवघ्या काही मिनिटांत पोहोचून जवानांनी ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढले.

अमरावतीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रामपुरी कॅम्प परिसरातील मिठू चक्कीजवळ निर्माणाधीन स्वागत प्रवेशद्वाराचा स्लॅब अचानक कोसळून भीषण अपघात घडला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या बांधकामाच्या ढिगार्‍याखाली सुमारे दहापैकी चार मजूर अडकल्याने प्रचंड खळबळ उडाली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जेसीबीच्या मदतीने ढिगारा बाजूला करून अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे निकृष्ट दर्जा आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Back to top button