मोर्शी मार्गावर अवैध बस वाहतूक; कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा

पत्रकार परीषदेत आरटीओवर मिलीभगतचा आरोप

रस्ता अपघातात मृतक परिवारास 15 लाख देण्याची मागणी

अमरावती/6 नोव्हेंबर – मोर्शी-अमरावती मार्गावर अवैध प्रवासी बस वाहतूक बिनदिक्कत सुरू असल्याचा आरोप करीत, वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. बसमालक आणि आरटीओ अधिकार्‍यांच्या कथित संगनमतामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या निष्काळजीपणामुळे 7 एप्रिल 2026 रोजी माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसच्या धडकेत 23 वर्षीय शिवप्रकाश कवलती या युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेला आरटीओ प्रशासन जबाबदार धरून संबंधित अधिकारी उर्मिला पवार यांच्या वेतनातून मृत युवकाच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
देवी मानकर, प्रमोद भुजे, अंबादास राऊत आणि राजू वानखडे यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. मोर्शी-अमरावती मार्गावरील अवैध बस वाहतूक बंद करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याकडे अनेकदा तोंडी आणि लेखी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने नागपूर येथील सचिवालयातही तक्रारीची माहिती घेतली. मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव आशा पठाण यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 1 नोव्हेंबर 2026 रोजी नागपूर येथे बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
गोर्‍हाळा (पिंगळा) बसथांब्यावर आरटीओचे कायमस्वरूपी तपासणी नाक्याची उभारणी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. अवैध बस वाहतूक पूर्णपणे बंद न झाल्यास नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आरटीओ अधिकारी उर्मिला पवार यांच्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Back to top button