चित्रा वाघ यांनी विचार करून बयाणबाजी करावी
माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांचा निशाणा

अमरावती/6 नोव्हेंबर – कोणत्याही विषयाची पूर्ण माहिती न घेता केवळ राजकीय हेतूने आरोप करणे योग्य नाही. आधी वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि त्यानंतरच बोलावे, अशा शब्दांत माजी मंत्री तथा काँग्रेसच्या आ. अॅड. यशोमती ठाकूर यांनी महायुतीच्या आ. चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला. अमरावती खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावरून सुरू झालेल्या वादात ठाकूर यांनी वाघ यांना लक्ष्य करत निवडून आलेले संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या प्रयत्नांवरही गंभीर सवाल उपस्थित केले.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही संस्थांच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आल्या होत्या. या दोन्ही संस्थांमध्ये आघाडीची सत्ता स्थापन झाली होती. मात्र, खरेदी-विक्री संस्था भाजपच्या नियंत्रणात गेल्यानंतर तेथे गटबाजी निर्माण झाली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्याशिवाय चित्रा वाघ यांनी कोणतेही विधान करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. अमरावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आघाडीचे संपूर्ण संचालक मंडळ निवडून आले होते. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या या संचालक मंडळाला आता बरखास्त करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. जनतेने मतदानातून निवडून दिलेले संचालक मंडळ हटविण्यामागचा नेमका उद्देश काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना ठाकूर म्हणाल्या की, खोटे बोलणे आणि त्याच गोष्टीची वारंवार पुनरावृत्ती करणे, हेच त्यांचे काम झाले आहे. भाजपच्या युवती संघटनेत काम केल्यानंतर आता भाजपकडून केली जाणारी चुकीची विधानेही त्यांना खरी वाटू लागली आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. या वक्तव्यामुळे अमरावतीतील सहकारी संस्थांच्या कारभारावरून राजकीय वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.





