समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
थारला मागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

धामणगाव रेल्वे /6 नोव्हेंबर-अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एका भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. नागपूर कॉरिडोअरवर चालत्या ट्रकने एका महिंद्रा थार कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात थार कारमधील एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. समृद्धी महामार्गावरील आयसी-6 (नवीन धामणगाव) अंतर्गत येणार्या चॅनल नंबर 99+900 (नागपूर कॉरिडोअर) येथे हा अपघात झाला. दत्तलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे हेड कॉन्स्टेबल नरेंद्र मेश्राम, एमएसएफ जवान स्नेहल तायडे आणि लखन राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथून महिंद्रा थार कार (क्र. चक-34-उऊ-2699) ने अक्षय ठाकरे, अशोक अंभोरे आणि अमित पांडे हे नागपूरच्या दिशेने जात होते. यादरम्यान पाठीमागून आलेल्या ट्रक (क्र. छङ-01–ग-3343) च्या चालकाने थार कारला मागून जोरदार धडक दिली. अशोक अंभोरे (वय 40 वर्षे) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. अक्षय ठाकरे (वय 27 वर्षे) यांच्या डोक्याला दुखापत झाली. अमित पांडे (वय 45 वर्षे) यांच्या कमरेला गंभीर मार लागला आहे.अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, जिथे अशोक अंभोरे यांना मृत घोषित करण्यात आले.घटनास्थळावरील ट्रकचालक गाडी जागेवरच सोडून पळून गेला. महामार्ग सुरक्षा पथकाने क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त थार कार बाजूला करून टोल नाक्यावर आणली असून, सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.





