तीन तीर्थक्षेत्रांच्या विकासाला 20 कोटींचे बळ

मोझरीसाठी 16 कोटी 55 लाखांचा निधी

* कौंडण्यपूर आणि वलगावच्या कामांनाही मंजुरी

अमरावती 6 नोव्हेंबर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी, श्री क्षेत्र कौंडण्यपूर आणि संत गाडगेबाबा वलगाव या तीन तीर्थक्षेत्रांच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तिन्ही ठिकाणच्या इमारतींची दुरुस्ती आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने तब्बल 20 कोटी 19 लाख 85 हजार रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये मोझरीसाठी 16 कोटी 55 लाख रुपये, कौंडण्यपूरसाठी 1 कोटी 84 लाख 20 हजार रुपये आणि वलगावसाठी 1 कोटी 80 लाख 65 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नगरगोजे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आशीष येरेकर, नियोजन विभागाच्या सहसचिव गीतांजली बाविस्कर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सचिन चिवटे उपस्थित होते. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आध्यात्मिक संकुल, ग्रामविकास प्रबोधिनी, भक्तनिवास आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या विश्रामगृहांसह एकूण 12 इमारतींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व इमारतींना कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कौंडण्यपूर येथे प्रसाधनगृह, पर्यटक विश्रामगृह, उपहारगृह, विश्रामगृह आणि पोहोच मार्गाची दुरुस्ती होणार आहे. वलगाव येथे इमारतींची रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता, फरशीची कामे, पावसाचे पाणी साठवण, पाणीपुरवठा आणि वीज व्यवस्था सुधारण्यात येणार आहे. या कामांमुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
तिन्ही तीर्थक्षेत्रांतील कामे पूर्ण झाल्यानंतर दुरुस्ती आणि हस्तांतरणाबाबत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.
Back to top button