चांदूर रेल्वेतील अत्याचार प्रकरणी दोघांना जन्मठेप
दोन आरोपींची निर्दोष मुक्तता

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
90 हजारांचा दंड पीडितेला
देण्याचे आदेश
अमरावती/6 नोव्हेंबर – चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे येथे 2 वर्षांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील शिवाजी बंडू चौधरी आणि राजेश ऊर्फ राजा शंकर कोहळे या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे अक्षय खांडे आणि आकाश पिल्लारे या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दंडाच्या रकमेपैकी 90 हजार रुपये अपील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सत्र न्यायाधीश एस. एम. कनकदंडे यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणातील घटना 29 जून 2024 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली होती. पीडिता आपल्या मोठ्या बहिणीसोबत घरी असताना आरोपी राजेश कोहळे तेथे आला. त्याने पीडितेच्या आईबाबत विचारणा केली. आई-वडील गावाला गेल्याचे समजल्यानंतर त्याने इतर आरोपींना दूरध्वनी करून घरी कोणी नसल्याचे सांगितले. पीडितेला भूक लागल्याने तिच्या बहिणीने तिला 5 रुपये देऊन चिप्स आणण्यासाठी पाठवले. मात्र, वाटेत शिवाजी बंडू चौधरी याने तिला अडवले. आजीच्या घरी सोडण्याचे सांगून तिला दुचाकीवर बसवले. पीडितेने नकार दिला असतानाही तिला गावाजवळील पाझर तलाव परिसरात नेण्यात आले. तेथे इतर आरोपींनाही बोलावण्यात आले. आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर पीडितेने पोलिसांत तक्रार केली. मात्र, गावात समाजातील एकच कुटुंब असल्याने सुरुवातीला भीतीपोटी कुटुंबीयांनी तक्रार करण्यास टाळाटाळ केली होती. 5 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे यांनी प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर पीडिता आणि तिचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर भारतीय दंड विधानातील कलम 363, 365, 366, 376 (ड), 377, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात 14 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी 2 साक्षीदार आरोपींचे नातेवाईक असल्याने फितूर झाले. तरीही उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने 2 आरोपींना दोषी ठरवले. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मंगेश भागवत यांनी सरकारची बाजू मांडली. उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे, चांदूर रेल्वेचे पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, जिल्हा न्यायालयातील पाठपुरावा करणारे रोशन दुधे आणि चांदूर रेल्वे येथील सोनल कुमारे यांनी सहकार्य केले.





