काँग्रेसची संस्कृती म्हणजे संसदेत गोंधळ

अमित शहा यांचा हल्लाबोल

‘मत चोरी’च्या आरोपांवर राहुल गांधींना आव्हान

नवी दिल्ली/5 नोव्हेंबर : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून सध्या वाद सुरू असून विरोधक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्याच्या काँग्रेस पक्ष ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करताना दिसत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, भाजप मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास तयार आहे. राहुल गांधींना आव्हान देत त्यांनी सुचवले की, अशा अधिवेशनाची मागणी करण्यासाठी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावे. सरकार या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास तयार आहे. परंतु काँग्रेसने खोटे पसरवणे थांबवावे आणि संसदीय चर्चेपासून पळ काढू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.हरियाणातील कर्नाल येथे आज आयोजित एका जाहीर सभेत अमित शहा भाजपद्वारे आयोजित ‘लोकतंत्र वाचवा, अराजकता हटवा’ मोर्चात सामील झाले होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी निदर्शनास आणून दिले की, देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून निवडून दिले आहे आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला वारंवार पराभवाचा सामना करावा लागला आहे. हरियाणामध्येही काँग्रेसने सत्तेत परतण्याचा दावा केला होता, परंतु मतमोजणीच्या पहिल्या पाच फेर्‍यांनंतरच त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. हरियाणाच्या जनतेने सलग तिसर्‍यांदा भाजप सरकार निवडून दिले आणि नायब सिंग सैनी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली.
महाराष्ट्र, दिल्ली, बिहार आणि आसामसारख्या राज्यांमधील निवडणुकांचा संदर्भ देत अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी सततच्या पराभवांमुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे आता ते आपल्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर आणि मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते संसदेचे कामकाजही चालू देत नाहीत आणि तिथे महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चाही करत नाहीत. संसदेत गोंधळ घातल्यानंतर आता ते रस्त्यावर गर्दी जमवून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भाजप काँग्रेसला प्रत्येक ठिकाणी जबाबदार धरेल, मग ती संसद असो, राज्यांच्या विधानसभा असोत किंवा देशातील गावे, शेते आणि शिवार असोत.
मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचे समर्थन करताना अमित शहा म्हणाले की, मतदार यादी शुद्ध करणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. त्यांनी दावा केला की, यादीत अनेक त्रुटीपूर्ण नोंदी आहेत, ज्यामध्ये मृत व्यक्तींची नावे, इतर राज्यांत स्थलांतरित झालेले लोक आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी झालेली नावे यांचा समावेश आहे. त्यांनी नमूद केले की, अशा प्रकारच्या त्रुटी सुमारे 10 कोटी नोंदींमध्ये आहेत. याव्यतिरिक्त, 3 कोटी व्यक्ती अशा आहेत, ज्या पडताळणीसाठी पुढे आलेल्या नाहीत. परंतु या गटात घुसखोरही समाविष्ट आहेत आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे, असा आरोपही शहा यांनी केला.

Back to top button