मालमत्ता कर थकविणार्‍यांवर मनपाचा कडक बडगा

दस्तूरनगरात दोन थकबाकीदार मालमत्तांना टाळे, पाच लाखांहून अधिक कराची थकबाकी

अमरावती/3 नोव्हेंबर- मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वारंवार सूचना देऊनही कराचा भरणा न करणार्‍या मालमत्ताधारकांविरुद्ध थेट जप्ती आणि सील करण्याची कारवाई केली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत दस्तूरनगर विभागातील दोन मोठ्या थकबाकीदार मालमत्तांना सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी टाळे ठोकण्यात आले.
0या दोन्ही मालमत्तांवर मिळून तब्बल 5 लाख 21 हजार 55 रुपयांचा कर थकीत असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. महानगरपालिकेच्या दस्तूरनगर विभाग क्रमांक 3 अंतर्गत येणार्‍या प्रभाग क्रमांक सी-8 मधील पोस्टमन कॉलनी परिसरातील ईगल कॉन्व्हेंट शाळेच्या मालमत्ता क्रमांक 278 वर 3 लाख 3 हजार 358 रुपये मालमत्ता कर थकीत होता. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही शाळा व्यवस्थापनाने थकीत रक्कम भरली नाही. त्यामुळे मनपाच्या पथकाने शाळेची मालमत्ता सील केली. दुसरी कारवाई एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील ओम नमः शिवाय डाळ मिलवर करण्यात आली. या मालमत्तेचा क्रमांक 2004 असून, त्यावर 2 लाख 17 हजार 697 रुपये कर थकीत होता. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित मालमत्ताधारकाने कराचा भरणा केला नसल्याने डाळ मिल सील करण्यात आली. ही कारवाई विभाग क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी प्रवीण ठाकरे, दीपक सरसे, आकाश चौधरी आणि आनंद बुंदिले उपस्थित होते. महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. थकीत कर वेळेत न भरणार्‍या मालमत्ताधारकांवर यापुढेही जप्ती आणि सील करण्याची कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी तातडीने कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Back to top button