अन्न व औषध प्रशासनाच्या धाकाने फराळ विक्रेत्यांची तारांबळ

डोक्यावर टोपी हातात हातमोजे स्वच्छतेला प्राधान्य

प्रत्येक पाकीटावर वापराची अंतिम तारीख नोंदविण्याची सक्ती

अमरावती /3 नोव्हेंबर– दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात फराळाच्या पदार्थांची मागणी वाढली असून शेकडो मिठाई दुकाने आणि फराळ निर्मिती केंद्रांमध्ये विविध पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या वाढलेल्या तपासणीमुळे यंदा फराळ विक्रेत्यांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. पदार्थ तयार करताना स्वच्छता राखणे, कामगारांनी डोक्यावर टोपी घालणे, हातात हातमोजे वापरणे, ताजे तेल व चांगल्या दर्जाचा कच्चा माल वापरणे, तसेच प्रत्येक पाकिटावर पदार्थ तयार केल्याची आणि वापराची अंतिम तारीख नमूद करणे, अशा नियमांचे पालन केले जात आहे.
प्रशासनाच्या कारवाईच्या धास्तीने मिठाई व्यावसायिकांनीही आपल्या कामकाजात आवश्यक बदल केले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभर सुरू असलेल्या कडक कारवाईचा परिणाम आता अमरावतीतही दिसू लागला आहे. गेल्या काही महिन्यांत शहरात अनेक ठिकाणी तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये लाखो रुपयांचा खाद्यसाठा जप्त करण्यासोबतच काही व्यावसायिकांचे परवाने निलंबित आणि रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. औषधांच्या दुकानांवरही तपासणीचे सत्र सुरू असल्याने खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये सावधगिरी वाढली आहे.
अमरावती मंडळाच्या प्रतिनिधींनी फराळ तयार करणार्‍या विविध कारखान्यांना भेटी दिल्या असता स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून आले. पदार्थ तयार करणार्‍या कारागिरांसह अन्य कामगारांनाही टोपी आणि हातमोजे वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यावर भर दिला जात असून तयार पदार्थ सुरक्षित ठेवण्याची काळजी घेतली जात आहे. फराळ उत्पादक उमेश महाराज यांनीही प्रशासनाच्या कारवाईमुळे व्यावसायिक अधिक सतर्क झाल्याचे सांगितले. लाडू, चिवडा, शेव, करंज्या यांसह मिठाई आणि इतर पदार्थ तयार करताना ताजे तेल, चांगल्या दर्जाचा कच्चा माल आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीच्या गर्दीत ग्राहकांना चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित पदार्थ मिळावेत, यासाठी व्यावसायिकांकडून काळजी घेतली जात आहे.

Back to top button