धनत्रयोदशीला वाहन खरेदीसाठी अमरावतीकरांची गर्दी

एकाच दिवशी हजारो वाहनांच्या चाव्या ग्राहकांकडे

 विद्युत वाहनांकडे तरुणांचा वाढता कल

अमरावती /1 नोव्हेंबर – दसर्‍यानंतर वाहन बाजारात आलेली तेजी धनत्रयोदशीलाही कायम राहण्याची चिन्हे आहेत. यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अमरावतीत वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. बाजारात मंदीचे वातावरण असतानाही शहरातील विविध वाहन विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असून, एकाच दिवशी सुमारे 400 चारचाकी आणि 2 हजारांहून अधिक दुचाकी ग्राहकांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांसोबतच विद्युत वाहनांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याने वाहन बाजारात यंदा चांगलीच रंगत आली आहे. अमरावती शहरात प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांची डझनभर दालने आहेत. दुचाकी वाहनांच्या विविध कंपन्यांची मिळून 30 ते 35 दालने कार्यरत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहितीनुसार, मागील 6 महिन्यांपासून दररोज सरासरी 175 वाहनांची नोंदणी होत आहे. या आकडेवारीवरून शहरातील वाहन बाजारातील वाढती मागणी स्पष्ट होते. वाहन विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, धनत्रयोदशीला वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे दसर्‍यापेक्षाही या दिवशी वाहन खरेदीला अधिक पसंती मिळते. यंदाही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आगाऊ नोंदणी केली आहे. आवडीचे वाहन मिळावे यासाठी ग्राहकांकडून आधीपासूनच नियोजन केले जात आहे. दुसरीकडे, तरुणांचा विद्युत वाहनांकडे कल वाढत आहे. बजाज चेतक, ओला, एमजी यांसह इतर कंपन्यांच्या वाहनांना चांगली मागणी आहे. कमी प्रदूषण, शहरातील वापरासाठी सोयीस्कर आणि शासनाचे अनुदान यामुळे महागडी असूनही विद्युत वाहनांची खरेदी वाढत आहे. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची गरजही वाढली आहे. त्यामुळे यंदा धनत्रयोदशीला वाहन बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button