शिक्षक भरती गुणवत्ता यादी जाहीर

अमरावती विभागातील नऊशे दोन जागा

उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन चाचणी

अमरावती/1 नोव्हेंबर – राज्यातील खाजगी शाळांमधील शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून अमरावती विभागातील 902 जागांसाठी उमेदवारांची मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राज्यभरात 10 हजार 328 जागांसाठी 11 हजार 493 उमेदवारांची शिफारस झाली असून यात अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळाली आहे. 3 ते 25 नोव्हेंबर दरम्यान मुलाखत व अध्यापन कौशल्याची चाचणी थेट शाळांमध्ये घेतली जाणार असून शिक्षक भरतीला वेग आला आहे.
राज्यात 27 मे ते 5 जून 2025 दरम्यान शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पार पडली होती. या परीक्षेसाठी 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 2 लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेला बसले आणि त्यातील 1 लाख 70 हजार 108 उमेदवारांनी स्वतःची प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण केली होती. मुलाखतीसह निवडीसाठी 1 लाख 31 हजार 505 जणांनी पसंतीक्रम नोंदवले होते. या प्रक्रियेत अमरावतीसह विदर्भातील हजारो डीटीएड आणि बीएड पदवीधर तरुणांनी नशीब आजमावले होते.
संस्थाचालकांच्या हातात मुलाखतीचे केवळ 10 गुण ठेवल्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता दिसून येत आहे. उमेदवारांचे 100 गुणांवर मूल्यांकन होणार असून त्यामध्ये लेखी परीक्षेसाठी 75 गुण, व्यावसायिक पात्रतेला 5 गुण आणि शैक्षणिक पात्रतेसाठी 10 गुण दिले आहेत. उर्वरित 10 गुण मुलाखत आणि प्रत्यक्ष शिकवण्याच्या कौशल्यासाठी ठेवले आहेत. यामुळे गुणवंत उमेदवारांनाच नोकरीची खात्री मिळणार असून संस्थाचालकांची मनमानी पूर्णपणे थांबणार आहे.अमरावती विभागातील पात्र उमेदवारांनी आता शाळा स्तरावरील चाचणीची तयारी सुरू केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार असल्याने शाळांना चांगले शिक्षक मिळतील. पुणे विभागात सर्वाधिक जागा असल्या तरी अमरावती विभागातील जागांसाठी स्थानिक पदवीधरांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.
विभागनिहाय रिक्त पदांचा अधिकृत तपशील- पुणे विभागात 2656 नाशिक विभागात 1850 कोल्हापूर विभागात 1822 जागा भरल्या जातील. छत्रपती संभाजीनगर विभागात 973 अमरावती विभागात 902 लातूर विभागात 877 नागपूर विभागात 862 आणि मुंबईत 386 जागांवर भरती होईल. अमरावती विभागातील 902 जागांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून वेगाने सुरू होणार आहे.
पहिली ते दहावी विषयनिहाय पदे-पहिली ते पाचवीसाठी 1609 पदे असून 4478 उमेदवार रिंगणात आहेत. सहावी ते आठवीसाठी सामाजिक शास्त्रे 371 पदे भाषा 1723 पदे गणित विज्ञान 1978 पदे विशेष शिक्षक 433 पदे आहेत. नववी ते दहावीसाठी सामाजिक शास्त्रे 218 पदे भाषा 1411 पदे गणित विज्ञान 1888 पदे आणि शारीरिक शिक्षण 627 पदे भरली जाणार आहेत.

Back to top button