शेतकर्याला नडाल तर खपवून घेणार नाही
मायक्रो फायनान्स, बँका आणि सावकारांना शिंदेंचा इशारा

मुंबई /27 ऑक्टोबर : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणार्या मायक्रो फायनान्स कंपन्या, फायनान्स कंपन्या, बँका आणि सावकारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. सक्तीची कर्जवसुली, मानसिक दबाव किंवा तगादा लावून शेतकर्याला आत्महत्येस प्रवृत्त करणार्यांना सरकार सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मायक्रो फायनान्स असो, फायनान्स कंपनी असो, बँक असो किंवा सावकारी कर्ज असो; शेतकर्याला नडणार्याला बिलकुल सोडणार नाही, असे शिंदे म्हणाले. नांदेडमधील सक्तीच्या
कर्जवसुलीच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ठाम भूमिका घेतल्याचे सांगितले. कर्जवसुलीसाठी शेतकर्याला कार्यालयात नेणे किंवा त्याच्यावर दबाव आणणे यासारखे प्रकार करणार्यांवर कठोर गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आरबीआय, बँका आणि वित्तीय संस्थांशी चर्चा करून आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. कर्जवसुलीसाठी कोणी तगादा लावला तर घाबरू नका. तात्काळ अधिकार्यांशी संपर्क साधा. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन शिंदे यांनी शेतकर्यांना केले.राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकर्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळणार असून, एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. दिवाळीपूर्वी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत ही तातडीची मदत असून, त्यासोबत शासनाच्या इतर सवलती आणि लाभही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, टँकर, चारा आणि अन्य सुविधांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धरणांच्या परिसरातील गाळपेर्यात चारा लागवडीला प्रोत्साहन देतानाच त्यासाठी हमीभाव आणि आर्थिक लाभ देण्याचे नियोजन असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. देशाच्या पंतप्रधानांवर अशा खालच्या पातळीवर टीका करणे निंदनीय आहे. मी कालही निषेध केला आणि आजही करतो. कारण मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. मोदी देश जोडण्याचे काम करत आहेत, तर काही लोक देश तोडण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण हा नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेश नाही, तर हा नवा भारत आहे, असे शिंदे म्हणाले.





