भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील वरखेड फाट्यानजीक घडला अपघात

तिवसा /27 ऑक्टोबर – नागपूरकडून अमरावतीकडे जाणार्‍या भरधाव ट्रॅव्हल्सने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना राष्ट्रीय महामार्गावरील वरखेड फाट्यानजीक घडली. उंबरखेड येथील रहिवासी असलेले दोघे जण तिवसा येथून आपल्या घराकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या भीषण अपघातात निखिल राजेंद्र बोके (वय 35), कैलास मनोहर कळंबे (वय 33) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला.
वरखेड फाट्याजवळ घडलेल्या या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, निखिल बोके, कैलास कळंबे हे दोघे मित्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिवसा येथून दुचाकीने आपल्या उंबरखेड गावाकडे निघाले होते. त्याच वेळी नागपूरकडून अमरावतीच्या दिशेने एमएच 14 एलएक्स 1320 क्रमांकाची पर्पल कंपनीची ट्रॅव्हल्स अतिशय वेगाने जात होती. महामार्ग ओलांडून वरखेड फाट्याकडे वळत असताना भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला थेट जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पार चक्काचूर झाला. दुचाकीवरील निखिल बोके, कैलास कळंबे हे दोघेही रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच गतप्राण झाले. अपघाताचा जोरदार आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी ट्रॅव्हल्ससह चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत गावातील दोन तरुण अचानक गेल्यामुळे संपूर्ण उंबरखेड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Back to top button