पश्चिम विदर्भातील असमतोलाचा अभ्यास

अमरावती विद्यापीठाचा पुढाकार

-अनूशेषावर चर्चा होणार
अमरावती / 30 जून: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राद्वारे एक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अनुशेषाची चर्चा केली जाणार असून एक महत्वपूर्ण दस्तावेज तयार केला जात आहे. त्यासाठी ‘पश्चिम विदर्भातील प्रादेशिक असमतोल’ या विषयावर संशोधन प्रकल्पांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर करण्याची आज 30 जून ही शेवटची तारीख होती.
सदर संशोधन प्रकल्पाचा विषय ‘शिक्षण व रोजगारामध्ये जिल्ह्याची स्थिती : कालावधी 2015 ते 2025’ हा असून प्रकल्पाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. या संशोधन प्रकल्पासाठी 20 हजार रुपये अनुदान दिले जाईल. जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती अभ्यासण्यासाठी वर्ग दहावी, बारावी व पदवी स्तरावरील विद्यार्थी गळतीचे प्रमाण तपासणे, उच्च शिक्षण व संशोधनात जिल्ह्यातील उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा अभ्यास करणे, उच्च शिक्षण व संशोधनामध्ये पदव्युत्तर व संशोधनामधील मुलामुलींची प्रगती अभ्यासणे, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण व सरकारी, खाजगी क्षेत्रातील नोकरीची स्थिती अभ्यासणे, केंद्र सरकार व राज्य सरकारद्वारा संचालित स्वयंरोजगार, मुद्रा, स्टार्टअप, कर्ज योजनांच्या प्रगतीचा अभ्यास करणे, शिक्षण व रोजगारासाठी जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करणे आदी मुद्दे संशोधनाची उद्दीष्टे असून संशोधनाची व्याप्ती 2020 ते 2025 अशी आहे.
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक सदर संशोधन प्रकल्पाकरिता अर्ज केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे यांनी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून कळवली होती.

संबंधित बातम्या

Back to top button