रामा गावात छापा टाकणार्‍या पोलिसांना जबर मारहाण

उपनिरीक्षकासह कर्मचार्‍यांना जीवे मारण्याची धमकी

उपायुक्तांसह तगडा फौजफाटा घटनास्थळी दाखल

अमरावती /15 ऑक्टोबर – वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामा गावात बेकायदा धंद्यांवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या खाकी वर्दीवर गावगुंडांनी अचानक हल्ला चढवून बेदम धक्काबुक्की केली. या भीषण राड्यात पोलिस उपनिरीक्षकासह सहकार्‍यांची गचांडी पकडून ठार मारण्याची उघड धमकी देण्यात आल्याने संपूर्ण शहर व ग्रामीण भागात प्रचंड थरकाप उडाला. या थराराची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त आणि पोलिस निरीक्षक रीता उइके यांनी मोठा फौजफाटा घेऊन थेट गावात धडक मारत अनेक समाजकंटकांना बेड्या ठोकल्या.
वलगाव पोलिसांच्या एका विशेष तपास पथकाला रामा गावातील संशयास्पद हालचालींची पक्की खबर मिळाली होती. या खबरीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक आणि अंमलदार गावात छापा टाकण्यासाठी पोहोचले. मात्र पोलिसांची गाडी गावात शिरताच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याने पळ काढण्याऐवजी खाकीलाच थेट आव्हान देण्याचा भयानक कट रचला. काही क्षणांतच गावगुंडांची टोळी गोळा झाली आणि त्यांनी पोलिसांच्या पथकाला चहूबाजूंनी वेढा घालून हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
कारवाई थांबवण्यासाठी या टोळक्याने पोलिसांवर थेट हात उचलला. अंगावर धावून जात उपनिरीक्षकासह अंमलदारांची गचांडी पकडून तुफान धक्काबुक्की करण्यात आली. वर्दीची अजिबात भीती न बाळगता या गुंडांनी पोलिसांना जिवंतगाडण्याची उघड भाषा वापरून गावात मोठी दहशत पसरवली. पोलिसांवरच असा जीवघेणा हल्ला झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांची घाबरून पळापळ झाली आणि गावात भीषण तणाव निर्माण झाला.
आपल्याच पथकावर हल्ला झाल्याचा निरोप वायरलेसवर धडकताच पोलिस नियंत्रण कक्षात प्रचंड खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त आणि वलगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षक रीता उइके यांनी क्षणाचाही विलंब न लावता दंगल नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा घेऊन थेट रामा गावाकडे गाड्यांचा ताफा पळवला. सायरनचा थरथराट करत दाखल झालेल्या पोलिसांच्या ताफ्याला पाहताच पोलिसांवर हात उचलणार्‍या गुंडांची चांगलीच बोलती बंद झाली.
वरिष्ठ अधिकार्‍यांनी गावात पाऊल ठेवताच संपूर्ण गावाची नाकेबंदी करून परिस्थिती पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतली. खाकी वर्दीवर हात टाकणार्‍यांचा माज उतरवण्यासाठी पोलिसांनी गावात जोरदार कोम्बिंग मोहीम राबवून संशयितांची झाडाझडती घेतली. कारवाईत अडथळा आणणार्‍या आणि धमक्या देणार्‍या अनेक गुन्हेगारांना घटनास्थळावरूनच ताब्यात घेऊन थेट पोलिस कोठडीत डांबण्यात आले. पोलिसांवर हात उचलणार्‍या एकाही समाजकंटकाला सोडणार नाही असा सज्जड दम देत पसार झालेल्या इतर गुंडांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडणे सुरू केले आहे.

Back to top button