सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी
मुंबई हायकोर्टाचे कडक निर्देश

मुंबई /15 ऑक्टोबर : राज्यभरात सध्या नवरात्रीचा उत्साह आहे. येत्या 20 ऑक्टोबरला दसरा सण असणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी दिवाळी सणाचा उत्साह राज्यभरात असणार आहे. दिवाळीत रात्री आकाशात फटाक्यांची आतषबाजी बघायला मिळते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक रस्त्यावंर फटाके फोडले जातात. यामुळे दुर्घटना घडण्याची देखील भीती असते. तसेच फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा मुद्दा नियमित चर्चेत येतो. याच विषयी मुंबई हायकोर्टात ‘सुओ मोटो’ याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने हे महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
खरंतर मुंबई हायकोर्टाने ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या समस्येच्या निमित्तानं याआधीच 22 सप्टेंबर रोजी फटाक्यांच्या बाबतीत निर्देश होते. त्यानुसार, हायकोर्टाने सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे फटाके वाजवण्यावर बंदी घातली होती. मात्र, तरीही गणेशोत्सव काळात काही ठिकाणी त्याचं उल्लंघन झालं. या गुरुवारी याचिकेवर पुढची सुनावणी होती. त्याचदरम्यान ‘दी असोसिएशन ऑफ फायरवर्क्स ट्रेडर्स’ने एक अर्ज केला आणि 22 सप्टेंबर रोजीच्या आदेशाबाबत नेमके स्पष्टीकरण देण्याची विनंती केली. त्यामुळे गुरुवारच्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने अधिक स्पष्टीकरण देणारा आदेश दिला. शिवाय सविस्तर आदेशाची प्रत नंतर उपलब्ध केली जाईल,असेही खंडपीठाने स्पष्ट केलं. तसंच फटाक्यांच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घतली नसल्याचंही खंडपीठाने स्पष्ट केलं.





